कोरोनाचा ‘शेवट’ करण्यासाठी पालिका, राज्य सरकारला सहकार्य करा, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि पालिकेच्या माध्यमातून अविरतपणे, अहोरात्र काम सुरू आहे. ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतून कोरोनाविरोधातील ही शेवटची लढाई आहे. त्यामुळे कोरोनाचा ’शेवट’ करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालिकेला सहकार्य करा असे आवाहन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी आज मुंबईकरांना केले.

कोरोना रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईत पालिकेचे कर्मचारी-स्वयंसेवक घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी, सर्वेक्षण आणि मार्गदर्शन करीत आहेत. त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे कवी अशोक नायगावकर यांनी म्हटले आहे. पालिकेच्या ’एम-पश्चिम’ विभागात आरोग्य सेवकांनी आज त्यांच्या घरी भेट दिली असता त्यांनी मुंबईकरांना कोरोना रोखण्यासाठी आवाहन करणारा व्हिडीओ शेअर केला. कोरोना रोखण्यासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्यासह अनेक कर्मचारी अहोरात्र आपल्या घरी न जाता काम करीत आहेत. आपण त्यांचे ऋणी राहिले पाहिजे. आता कोरोना विरोधातील ही अंतिम लढाई आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. गर्दी टाळली पाहिजे. सोशल डिस्टन्स पाळला पाहिजे. केवळ सरकार काही तरी करेल आणि आपण नुसते बसून राहू असे केले तर ते आपल्या अंगाशी येईल. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. त्यामुळे कोरोनाचा शेवट करण्यासाठी सरकार आणि पालिकेला सहकार्य करा असे आवाहनही त्यांनी केले.