सीमा शुल्क विभागाने नळदुर्ग-सोलापूर रस्त्यावर केलेल्या कारवाई एका ट्रकमधून तब्बल 412 किलो गांजा पकडला आहे. बाजारपेठेत गांजाची किंमत 65 लाख असून वाहनसहित 85 लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सीमा शुल्क अधिकारी पी. के. बेहेरा यांनी दिली आहे.
आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये ट्रकमधून गांजाची विक्री होणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने नळदुर्ग-सोलापूर महामार्गावर सापळा रचून ट्रकचालकाला ताब्यात घेतले. वाहनामध्ये तपासणी केली असता, 206 पिशव्यांमध्ये 412 किलो गांजा असल्याचे मिळून आले. पुण्याच्या सीमा शुल्क विभागाकडून ताब्यात घेतलेल्या ट्रकचालकाकडे चौकशी करण्यात येत असल्याचे बेहेरा यांनी सांगितले.






























































