जदयू 122 तर भाजप 121 जागा लढणार, पासवान ‘एनडीए’ बाहेरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभा निवडणुकीत जागा वाटप निश्चित करताना जदयू 122 तर भाजप 121 जागा लढणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी केली. चिराग पासवान यांचा लोजपा ‘एनडीए’ बाहेरच राहणार असून, स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

बिहारमध्ये जदयू, भाजप आणि लोजपा अशी एनडीए विरुद्ध राजद, काँग्रेस आणि डावे पक्ष यांची महाआघाडी अशी लढत होणार होती. परंतु चिराग पासवान यांनी नितिशकुमार नको, पण भाजप हवे असा पवित्रा घेतला आणि बिहारमध्ये ‘एनडीए’तून लोजपा बाहेर पडली. मंगळवारी जदयु आणि भाजप नेत्यांच्या बैठकीत जागा वाटप निश्चित झाले. महाआघाडीचे जागा वाटप यापूर्वीच झाले आहे.

संयुक्त पत्रकार परिषदेत जदयुचे सर्वेसर्वा, मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी जागा वाटपाची घोषणा केली. विधानसभेच्या 122 जागा जदयु लढविणार आहेत. त्यात जदयूकडून माजी मुख्यमंत्री जितमराम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवामी मोर्चाला सात जागा देण्यात येतील. भाजप 121 जागा लढणार असून, मुकेश सहानी यांच्या विकसनशील पक्षाला काही जागा सोडणार आहे.

कोणाला कितीही जागा मिळाल्या तरी नितिशकुमारच मुख्यमंत्री

भाजपला जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता भाजप नेते, उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी म्हणाले, नितिशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये निवडणूक लढविली जात आहे. कोणाला कितीही जागा मिळाल्या तरी नितिशकुमार हेच आमचे मुख्यमंत्री असतील.

जदयुच्या पाठिंब्याशिवाय पासवान राज्यसभेवर गेले का? – नितिशकुमार

लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांचे नाव न घेता नितिशकुमार यांनी जोरदार टोला लगावला. काही लोकांना काय निर्णय घ्यायचा ते घेऊ द्या. त्याने मला फरक पडत नाही. केंद्रीयमंत्री रामविलास पासवान जदयुच्या पाठिंब्याशिवाय राज्यसभेवर गेले का? याचा विचार त्यांनी करावा असे नितिशकुमार यांनी फटकारले.

  • एनडीए
    भाजप 121
    जदयू 115
    हम 07
    वीआयपी
    भाजप आपल्या कोट्यातील जागा देणार
  • महाआघाडी
    राजद 144
    काँग्रेस 70
    डावे 29
    झामुमो
    राजद आपल्या कोटय़ातील जागा देणार