
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीवर (मोनिट्री पॉलिसी कमिटी) केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या आणि मुंबई येथील इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चच्या प्राध्यापक आशिमा गोयल, नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाइड इकनोमिक रिसर्चचे वरीष्ठ सल्लागार शशांक भिडे आणि अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक जयंत वर्मा यांची बाह्य सदस्य म्हणून नियुक्ती केली. या समितीवर कार्यरत असलेल्या तीन सदस्यांचा चार वर्षाचा कार्यकाल सप्टेंबर अखेर संपला होता. त्यामुळे सरकारने या नियुत्त्या केल्या आहेत.
व्याजदर निश्चितीबरोबरच पतधोरण ठरवण्याचे काम ही समिती करते. आरबीआयच्या पतधोरण समितीवर सहा सदस्य असतात. त्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि आरबीआयचे कार्यकारी संचालक हे तीन आणि अन्य तीन बाह्य सदस्यांच्या नियुत्त्या सरकार करते. या समितीवर बाह्य सदस्य म्हणून रवींद्र ढोलकिया, पामी दुआ आणि चेतन घाटे या तिघांचा चार वर्षाचा कार्यकाल सप्टेंबर अखेर संपल्याने एमपीसी कमिटीची 29 सप्टेंबर रोजीची बैठक कमी सदस्य संख्येमुळे होऊ शकली नव्हती.


























































