
यूपीच्या हाथरस गावातील सामूहिक अत्याचार प्रकरणाचे भांडवल करून उत्तरप्रदेशात जातीय दंगली घडवण्याचा भीषण कट उत्तर प्रदेश पोलिसांनी उधळला आहे. या कटासाठी दिल्लीतून मथुरेत आलेल्या चार आरोपींना पोलिसांनी सबळ पुराव्यांसह अटक केली आहे. हे आरोपी प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय) या संघटनांचे कार्यकर्ते आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल्स आणि हाथरस गँगरेप प्रकरणी जाती-जातीत तेढ निर्माण करू शकेल असे वादग्रस्त साहित्य आणि पत्रके जप्त केली आहेत. या कटासाठी विदेशातूनही निधी आल्याचा संशय पोलिसांना आहे.
जेरबंद आरोपींपैकी तिघे यूपीचे
जेरबंद आरोपींपैकी तिघे यूपीचे आहेत.त्यात मुजफ्फरनगरचा अतीक, बहराइचचा मसूद अहमद, रामपुरचा आलम आणि केरळच्या मल्लापुरमचा सिद्दीक यांचा समावेश आहे. हाथरस प्रकरणावरून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न होणार याची भनक आधीच गुप्तचर आणि युपी पोलिसांना होती. त्यामुळे राज्यभरात आयोजित नाकाबंदीदरम्यान पोलिसांना सोमवारी रात्री 11 वाजता मथुरा येथील टोल प्लाझावर एक संशयित स्विफ्ट डिझायर कार दिसली.त्यात बसलेल्या चौघांची हालचाल संशयित वाटल्याने पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली.त्यात हे चौघे दिल्लीहून मथुरेत आल्याचे स्पष्ट झाले.अधिक तपासणी करताना ते पीएफआय आणि सीएफ आय या प्रतिबंधित संघटनांचे सदस्य असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडे सापडलेली भडकाऊ पत्रके आणि लॅपटॉप जप्त केल्यावर एका भीषण कटाचा सुगावा पोलिसांना लागला.या शिवाय त्यांच्याकडील रोख रक्कम सापडल्याने आता त्यांच्याविरोधात मनी लॉण्डरिंगचाही गुन्हा पोलीस दाखल करणार आहेत. अटकेतील एक जामिया विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे उघड झाले आहे.
























































