
मागील महिन्यात महापुरामुळे शेतपिक नुकसानीचे घाव ताजे असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर निसर्गाने पुन्हा अवकृपा दाखवली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे धान पीक अक्षरशः भुईसपाट झाले. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला असून चांगल्या उत्पन्नाची आशाही आता धुसर झाली आहे. यावर्षी 1994 नंतर गडचिरोली जिल्ह्यात कधी नव्हे एवढा महापूर आला.
मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने जिल्ह्यातील वैनगंगा कोपली. 1 महिन्यापूर्वी वैनगंगा नदीच्या पुरामुळे जिल्ह्यातील तब्बल 24 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले. पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असला तरी अद्यापही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या हाती पडलेली नाही. शेकडो शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच ज्या शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला नाही, त्या शेतकऱ्यांचे धान, कापूस पीक जोमात होते. मात्र जिल्ह्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस सुरू असल्याने धान पीक पूर्णतः भुईसपाट झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान पीक अंतिम टप्प्यात आहे. पिकावर किडीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकरी हजारो रुपये खर्च करून कीटकनाशकांची फवारणी करत आहेत. अशातच वादळामुळे धानपीक जमिनीवर झोपल्याने पीक खराब होऊन दर्जा घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा धानाला भावही येणार नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. आधीच महापुराचा फटका, त्यात आता वादळामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदतीची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.




























































