
मानवाला पृथ्वीपेक्षाही जीवसृष्टीला योग्य असलेल्या डझनभर ग्रहांचा शोध संशोधकांनी लावला आहे. हे ग्रह आपल्या सौरमंडळाच्या बाहेर आहेत. वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधक डर्प शुझ-मॅकच यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले. त्याचा अहवाल ‘अॅस्ट्रोबायोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या ग्रहांचा संशोधकांनी ‘सुपरहॅबिटेबल प्लॅनेट्स’ असा उल्लेख केला आहे.
या अहवालानुसार हे ग्रह खूप जुने आहेत. त्यांचा आकार थोडा मोठा असून त्यावरील वातावरण पृथ्वीपेक्षा थोडे गरम आहे. तेथील वातावरणात आर्द्रता असण्याचीही शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. हे ग्रह पृथ्वीपासून 100 प्रकाशवर्ष पेक्षाही दूर आहेत. परंतु भविष्यातील अभ्यासासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो. ‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपद्वारे ते संशोधन केले जाऊ शकते असे संशोधकांनी म्हटले आहे.
पुढील संशोधनासाठी यातील काही ग्रहांची आधी निवड करावी लागेल. हे संशोधन करताना आपण दुसऱया पृथ्वीचा शोध घेण्याच्या भानगडीत पडू नये कारण कदाचित या ग्रहांपेक्षाही चांगले वातावरण असलेले आणखी ग्रह पुढे असू शकतात, असे डर्प शुझ-मॅकच यांनी म्हटले आहे.






























































