आयडॉलच्या सर्व परीक्षा 19 ऑक्टोबरपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) रद्द झालेल्या सर्व परीक्षा 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल असेही विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले.

विद्यापीठाच्या वेबसाईटवर झालेल्या सायबर अटॅकमुळे 3 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या आयडॉलच्या परीक्षाच होऊ शकलेल्या नाहीत. परीक्षेची लिंक ओपन होण्यास तसेच विद्यार्थ्यांना पेपरकोड मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आयडॉलच्या पदवीच्या विद्यार्थ्यांचे आतापर्यत झालेले दोन्ही पेपर बुडाले आहेत. बुधवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या परीक्षा 19 ऑक्टोबरपासून होणार असून परीक्षा घेतांना कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही याची दक्षता विद्यापीठाच्या वतीने घेतली जाणार आहे तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही उभारण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू नये असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.