
समर्थ रामदास स्वामींच्या परंपरेतील किर्तन सेवा पुढे नेणारे आणि बीडमधील जेष्ठ कलावंत सुधाकरराव भगवानराव रामदासी यांचे 26 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडवासीय मोठ्या कलाकाराला मुकले आहेत. बीडचे बालगंधर्व अशी सुधाकरराव यांची ओळख होती. तसेच ते संत साहित्याचे व्यासंगी होते. या क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे.
समर्थ रामदास स्वामींचे विचार गावागावात आणि घराघरात पोहचावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. समर्थ रामदास स्वामींचे भक्त अशीही त्यांची ओळख होती. त्याचबरोबर बीडचे बालगंधर्व म्हणून कलाविश्वात त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. अनेक पौराणीक, धार्मिक आणि सामाजिक आशय असलेल्या नाटकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकरल्या. त्यांनी स्त्री भूमिका साकारत रसिकांना हासू आणि आसू यांची अनुभूती दिली. त्यांनी भक्त प्रल्हाद, मराठ्यांची लेक, स्वर्गावर स्वारी, बाळ चिलिया, सख्खे भाऊ पक्के वैरी-अर्थात रक्तात न्हाली कुर्हाड, फुलाला सुगंध मातीचा, संगीत सम्राट आदी नाटकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. ते स्वतः गायक, हर्मोनियम वादक व किर्तनकार होते. तसेच ते संत साहित्याचे व्यासंगी होते. त्यांनी संत रामदास स्वामी यांच्या जीवन कार्यावर आधारित पुस्तकाचे लेखन केले आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी भेट देत पुरावे जमवून त्यांनी हे लिखाण केले आहे. गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील किर्तन परंपरा पुढे चालवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्वाचे आहेत.

































































