
राज्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या मुत्यूचा मुद्दा हाती घेत, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारविरोधात भाजपने गुरुवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या राज्यव्यापी नबाना चलो आंदोलनात शेकडों भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी वॉटर पॅननचा वापर केला. यात पक्षाचे उपाध्यक्ष आणि खासदार जखमी झाले. तर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीहल्ल्यात शेकडो भाजप कार्यकर्ते जखमी झाले. शांततेत करण्यात आलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून यावेळी करण्यात आला.
दरम्यान, तृणमुल सरकारने बुधवारी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या मोर्च्याच्या आयोजनास परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, रॅली झालीच तर त्यात केवळ 100 लोकांनाच यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे नबानामध्ये गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने या भागात साफसफाई करण्यासाठी दोन दिवस हा परिसर बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.



























































