ओबीसी व मराठा समाजात फूट पाडण्याचा काहींचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओबीसी व मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे व ओबीसीच्या आरक्षणला धक्का लागता कामा नये. महाराष्ट्र पेटवण्याचे काम करू नका. सनदशीर मार्गाने आंदोलन करा असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण, कोरोना, हाथरसमधील सामूहिक बलात्कार घटना, विदर्भातील अतिवृष्टीचा आढावा घेतला. यावेळी केलेल्या भाषणात राज्य सरकारवर टीकाही केली.

आम्ही सरकारसोबत
मराठा समाजाला आवाहन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र जळतो तेव्हा सरकार नाही तर सामान्य माणूस जळतो. त्यामुळे आम्हाला उद्रेक नको, सनदशीर मार्गाने आंदोलन करा. आम्ही हा तिढा सोडवण्यासाठी सरकारसोबत आहे. आम्ही विरोधकांची भूमिका घेतलेली नाही. सरकारला संपूर्ण सहकार्य करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवार यांच्यावर टीका
यावेळी केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. त्यांनी कृषी विधेयकाला विरोध केला नाही तर राज्यसभा सदस्यांना निलंबित केले म्हणून एक दिवस उपोषण केल्याची टीका केली.