कोल्हापूर- नवरात्रोत्सवात अंबाबाईचे मंदिर बंदच, सर्व परंपरा मात्र जोपसल्या जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच मंदिरे अद्यापही बंद ठेवली आहेत. आता शासनाच्याच सुचनेनुसार यंदाचा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सव लोक सहभागाशिवाय करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.

या नऊ दिवसांत मंदिरातील नित्य अभिषेक, विविध पूजा, पालखी सोहळा या सर्व परंपरा जोपासल्या जाणार आहेत. यावेळी मंदिरातील प्रमुख पुजारी, सोहळ्याचे मानकरी, पदाधिकारी यांच्या शिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही जाधव यांनी सांगितले. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवात दरवर्षी 20 ते 25 लाख भाविक विविध ठिकाणांहून दर्शनासाठी येतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर शारदीय नवरात्र काळात भाविकांसाठी बंद राहणार आहे.

श्री.अंबाबाईची पूजा, नगरप्रदक्षिणेसही भाविकांना उपस्थित राहता येणार नाही. परंपरेप्रमाणे सर्व विधी करण्यात येणार असून, मंदिरातील दरवर्षीचे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले असले तरी 9 दिवस धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंदिराला विद्युत रोषणाई केली जाणार आहे. या काळात मंदिराचे चारही दरवाजे बंदच ठेवण्यात येणार आहेत. देवीची रोज विविध रूपातील पूजा आणि दर्शन भाविकांना व्हावे यासाठी थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व विधींचे थेट प्रक्षेपण शहरातील विविध चौकात करण्यात येणार आहे. यंदा नगरप्रदक्षिणासाठी पालखी वाहनातून नेण्यात येणार आहे. टेंबलाईवाडी येथे होणारा ललित पंचमीचा कार्यक्रम मानकऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच मंदिर दररोज सॅनिटाईझ केले जाणार आहे. तर उत्सवानंतर श्री अंबाबाईचा महाप्रसाद (भंडारा) ही यावर्षी सामान्य भाविकांसाठी होणार नसून केवळ मंदिराशी निगडीत घटकांच्या माध्यमातून देवीचा नैवेद्य विधी होणार असल्याचेही महेश जाधव यांनी सांगितले.