शहरात नसेल, पण ग्रामीण भागात अजून जातीचेच वर्चस्व; नवाजुद्दीन सिद्दीकीने फाडला जातीभेदाचा बुरखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने शुक्रवारी ग्रामीण हिंदुस्थानातील जातीभेदाचा बुरखा फाडला. शहरी संस्कृतीत भले जात गौण असेल, परंतु ग्रामीण भागात अजूनही जातीचेच वर्चस्व आहे. आपल्या समाजात जातीभेदाची पाळेमुळे खोलवर रुतली आहेत. समाजात विखुरलेली जातीची बंधने तोडली पाहिजेत, असे आवाहन नवाजुद्दीनने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीद्वारे केले. याचवेळी त्याने उत्तरप्रदेशातील जातव्यवस्थेची पोलखोल केली.

उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचार व हत्येच्या पार्श्वभूमीवर नवाजुद्दीनने वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. हाथरसमधली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. निष्पाप तरुणीवरील अत्याचाराविरोधात संपूर्ण देशातील जनता आवाज उठवत आहे ही एक चांगली गोष्ट आहे. आपण सर्वांनी मिळून समाजातील जातीभेदाची बंधने तोडली पाहिजेत, असे नवाजुद्दीनने नमूद केले. शहरी संस्कृतीत भले जातीला गौण स्थान असेल. मात्र ग्रामीण हिंदुस्थानच्या समाजव्यवस्थेत अजूनही जातीचेच वर्चस्व आहे. एका समुदायात छोटय़ा-मोठय़ा जातींमध्ये भेदभाव केला जातो. ग्रामीण भागात अजून पुरेशी जनजागृती झालेली नाही. शहरवासीयांच्या तुलनेत इथल्या लोकांवर सोशल मिडियाचा कमी प्रभाव आहे, असे मत नवाजुद्दीनने यावेळी व्यक्त केले.

माझ्या कुटुंबालाही काही गावकऱ्यांकडून दुजाभाव!
जातीभेदाची झळ आपल्या कुटुंबालाही बसल्याचे नवाजुद्दीनने सांगितले. माझी आजी खालच्या जातीतील होती, तर आमचे शेख कुटुंब होते. आजीच्या लग्नापासून आतापर्यंत आमच्या कुटुंबाला गावातील काही लोकांनी दूरच ठेवले आहे. ती मंडळी अजूनही तुच्छतेच्या भावनेतून माझ्या कुटुंबांकडे पाहतात. तुम्ही बॉलीवूड अभिनेता असाल किंवा करोडपती. त्यांना केवळ जातीशीच देणेघेणे असते, अशा शब्दांत नवाजुद्दीनने जातीभेदावर तीव्र नाराजी व्यक्त केली.