
>> प्रशांत गौतम
‘चांदोबा’ या मुलांच्या मासिकाने अनेक पिढय़ांचे रंजन-मनोरंजन केले. त्यासाठी शंकर यांनी पाच दशकांहून अधिक काळ लक्षणीय योगदान देत आपल्या आकर्षक चित्रांनी देशभरात ओळख निर्माण केली. शंकर आणि त्यांनी रेखाटलेला विक्रम आणि वेताळही अजरामरच राहील यात शंका नाही.
‘चांदोबा’चे चित्रकार चांदोबाला भेटायला ढगात गेले. लहान मुले असोत की मोठी मंडळी असोत, अशा सर्वांना ‘चांदोबा’ या मासिकातील प्रख्यात चित्रकार के. सी. शिवशंकर यांच्या चित्रांनी पाच दशकांहून अधिक काळ आकर्षित केले. त्यांचे बालमन समृद्ध केले. चांदोबा देशभरात लोकप्रिय होता तो विक्रम-वेताळाच्या चित्रांनी! एखाद्या चित्रकाराचे एखाद्या मासिकाशी किती अतूट नाते जडले होते याचे अलीकडच्या काळातील उत्तम उदाहरण म्हणजे ‘चांदोबा’ हे मुलांचे लोकप्रिय मासिक आणि चित्रकार के. सी. शिवशंकर यांचे सांगता येईल. शंकर यांनी पाच दशकांहून जास्त काळ या मासिकासाठी आपल्या अद्भुत कुंचल्यातून वैशिष्टय़पूर्ण चित्रे रेखाटली. ‘चांदोबा’ एकेकाळी तेरा भाषांत प्रसिद्ध होत असे. त्यामुळे या मासिकाचे नाव घराघरात पोहोचले होते. शंकर यांनी ‘विक्रम वेताळ’ मालिकेत जी अफाट चित्रे रेखाटली, त्यात हातात तलवार आणि पाठीवर वेताळाला घेतलेला विक्रम राजा यांची कथामाला चित्रांसह अजरामर ठरली. 1940 सालापासून सुरू असलेले ‘चांदोबा’ मासिक 2013 साली बंद पडले, मात्र शंकर यांनी रेखाटलेल्या चित्रांसह अनेकांच्या लक्षात राहिले. टोकदार तलवार आणि तेवढीच टोकदार मिशी असलेला, प्रेताला पाठीवर घेऊन स्मशानातील मुंडक्यांच्या राशीतून चालणारा विक्रमादित्य त्यांनी पाच दशके रेखाटला व नंतरच्या काळात हीच चित्रे ‘चांदोबा’ मासिकाची वेगळी ओळख बनून गेली. या मासिकातील विक्रम-वेताळाच्या कथा व चित्रांनी आपला प्रभाव प्रदीर्घ काळ अनेक पिढय़ांवर ठेवला. ते गारुड आजही कायम आहे.
शंकर यांचा जन्म तामीळनाडूमधील एरोडजवळील एका गावात 1923 साली झाला. वडील शिक्षक असल्याने शैक्षणिक संस्कार त्यांच्यावर झाले. दहाव्या वर्षी शंकर शालेय शिक्षणासाठी मद्रासमध्ये आले. महापालिकेची ही शाळा होती आणि शिक्षक विद्यार्थ्यांतील गुणवत्ता हेरणारे होते. चित्रकलेच्या शिक्षकांनी शंकरमधील अभिजात चित्रकौशल्याचे गुण अचूक हेरले. शंकरमधील रुची, क्षमता आणि दर्जा वेगळा असल्याचे शिक्षकांना जाणवले. लहानपणापासून शंकर यांच्या बोटांना दैवी देणगी लाभलेली होती. शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयापर्यंतचा प्रवास आपल्या रंगरेषांनी तर त्यांनी समृद्ध केला होताच, त्याच जोरावर त्यांनी संघर्ष सुसहय़ केला. कागद व रेषांची गरज असो की मुलांची चित्रं दुरुस्त करण्याचे कार्य असो, त्यासाठीची मदत शंकर देत असत. शिक्षकांच्या आग्रहामुळे त्यांनी काही काळ ‘कालाय मंगल’साठी काम केले. 1940 साली ते ‘चांदोबा’च्या समूहात सामील झाले. बी. नागारेड्डी आणि चक्रपाणी यांनी 1940 साली ‘चांदोबा’ सुरू केला. पुढे तो तेरा भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागला. 1952 साली म्हणजे वयाच्या बाविसाव्या वर्षी ते महिना साडेतीनशे रुपये पगारावर नोकरी करू लागले. त्यावेळी रंगीत छपाई तंत्र नुकतेच आले होते, पण ऑफसेट तंत्रापासून दूर होते. शंकर ‘चांदोबा’चे प्रमुख चित्रकार होते. तत्कालीन चित्रकलेचे तंत्र आत्मसात करून त्यांनी ‘चांदोबा’तील कथांची चित्रे रेखाटली. ज्या चित्राची सर्वाधिक चर्चा होते, त्या विक्रम आणि वेताळाच्या रंगीत आणि कृष्णधवल चित्रांच्या छपाईची तंत्रसंगती शंकर यांनी अचूक साधली. पाठीवर वेताळाचे ओझे घेतलेला विक्रमादित्य राजा, त्याचे हावभाव आणि स्मशानातील वातावरण या चित्रीकरणात शंकर यांनी कौशल्य प्राप्त केले. दहा वर्षापर्यंत आपल्या गावीच शिक्षण घेणारा चित्रकार महानगरपालिकेच्या शाळेत येतो काय आणि आपल्या हस्ताक्षरांवरून कार्यकौशल्याची झलक दाखवतो काय…हे सर्वच भारावून टाकणारे आहे. ‘चांदोबा’ या मुलांच्या मासिकाने अनेक पिढय़ांचे रंजन-मनोरंजन केले. त्यासाठी शंकर यांनी पाच दशकांहून अधिक काळ लक्षणीय योगदान देत आपल्या आकर्षक चित्रांनी देशभरात ओळख निर्माण केली. शंकर आणि त्यांनी रेखाटलेला विक्रम आणि वेताळही अजरामरच राहील यात शंका नाही.



























































