बीकेसी जमीन न्यायालय खटल्यात एमएमआरडीएने मोजले 1.09 कोटी, माहितीच्या अधिकारात माहिती उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईपासून दिल्लीपर्यंत बीकेसी येथील जमीन न्यायालय खटल्यात एमएमआरडीएने चक्क रु 1.09 कोटी मोजले असल्याची माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे. या खटल्यासाठी  तगड्या वकिलांची फौज उभारूनही खटल्यात लीजधारक  जिंकले आणि एमएमआरडीए हरतच चालली आहे. विशेष म्हणजे, एकावर एक खटले हरल्यानंतरही मणियार श्रीवास्तव असोसिएटस् या कंपनीला 1 कोटीची रक्कम अदा करण्यात आली असल्याचे प्रकाशात आले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीएच्या विधी खात्याकडे एमएमआरडीए प्रशासनाने जी ब्लॉक अंतर्गत रघुलीला बिल्डर्स, मेसर्स नमन हॉटेल लिमिटेड, रिलायंस इंडस्ट्रीज, इंडियन न्यूजपेपर सोसायटी आणि अन्य लीजधारकांनी थकबाकी न भरता जारी केलेल्या नोटीसविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यासाठी वकिलांवर करण्यात आलेल्या खर्चाची माहिती मागितली होती. त्यावेळी वरील माहिती समोर आली आहे.

खटला हरल्यानंतरही एकच कंपनी कायम का?

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच एमएमआरडीए आयुक्त आर.ए. राजीव यांना पत्र पाठविले आहे. एमएमआरडीएतर्फे कार्यवाही झालेली नसल्याने ही वेळ आल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. नामवंत वकिलांची फौजसुद्धा कुचकामी ठरल्याने थकबाकीच्या वसुलीऐवजी जनतेच्या करातून का, असा सवाल त्यांनी केला आहे. तर खटला हरल्यानंतरही एकाच कंपनीला कायम का ठेवण्यात आले, असा प्रश्न गलगली यांनी उपस्थित केला आहे.