एचएएल हेरगिरी प्रकरण – आयएसआयला माहिती देण्यासाठीच शिरसाठचा बदलीला विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तहेर संघटनेला ओझर येथील हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या लढाऊ विमाने बनविणाऱया कारखान्यातील संवेदनशील माहिती सोशल मीडियाद्वारे पुरविणारा सहाय्यक सुपरवायझर दीपक शिरसाठच्या कारनाम्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे. आयएसआयच्या ‘हनी ट्रप’मध्ये अडकलेल्या शिरसाठचा ही माहिती पुरविण्यासाठीच अन्य विभागातील बदलीविरुद्ध व्यवस्थापनाशीच संघर्ष सुरू होता, अशी माहिती पुढे आली आहे.

मूळ सिन्नर तालुक्यातील आणि सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास असलेला दीपक शिरसाठ हा सन 2004 पासून ‘एचएएल’च्या रबर आणि प्लॅस्टिक विभागात सहाय्यक सुपरवायझर होता. दहा वर्षांपूर्वी कामगार संघटनेवरही त्याने प्रतिनिधित्व केले आहे. सोशल मीडियाद्वारे जानेवारी 2019 पासून तो आयएसआयच्या ‘हनी ट्रप’मध्ये अडकला आणि त्याने एचएएलमध्ये बनविण्यात येणाऱया लढाऊ विमानांची, प्रतिबंधित क्षेत्राची आणि इतर संवेदनशील क्षेत्राची माहिती सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानला पुरविण्यास सुरुवात केली, अशी माहिती एटीएसने दिली. अय्याशी वृत्ती असलेल्या शिरसाठची वर्तणूक आधीपासूनच आक्रमक होती. 2019 पासून तर तो व्यवस्थापनाशी उघड संघर्ष करीत होता. अँड्रॉईड मोबाईलला एचएएलमध्ये बंदी असतानाही तो हा मोबाईल स्वतःजवळ बाळगायचा, त्याच्या बेशिस्त वर्तणुकीबद्दल अधिकाऱयांनाच तो उलट समज द्यायचा, अशी चर्चा एचएएल कामगारांच्या वर्तुळात सुरू आहे. तब्बल पंधरा महिने कर्तव्य न बजावल्याने त्याच्या वेतनावरही निर्बंध आणले गेले होते. पाकिस्तानच्या आयएसआयला माहिती पुरविण्यासाठी बदली नाकारून त्याने व्यवस्थापनाशी संघर्ष सुरू ठेवला होता, हे त्याच्यावर एटीएसने केलेल्या कारवाईनंतर उघड झाले आहे.