
>> वीणा जामकर (अभिनेत्री)
लॉकडाऊनच्या काळात मी एकटीच मुंबईत आणि आई-वडील गावाला. सोशल लाईफ पूर्णपणे बंद. यातून अनामिक भीती वाटू लागली आणि अध्यात्माच्या वाटेने रस्ता सुकर केला.
चित्रपटात जास्त काम करत असल्याने माझे वर्षातले कामाचे दिवस कमी असतात. त्यामुळे एखाददुसरा महिना घरी आहे असे बऱयाचदा अनुभवलेय आणि त्याची सवय पण होती. मला सुरुवातीला वाटले की, घरात दोन-तीन महिने थांबणे मला जमू शकतं, पण हा महारोग वेगळा होता याचं कारण म्हणजे अनवधानाने मी एकटी मुंबईत आणि माझे आई-बाबा गावाला अडकले होते. दुसरं असं झालं की, पूर्णपणे सोशल लाईफ बंद झालं होतं. आठवडय़ातून पंधरा मिनिटे भाजीसाठी एकदा बाहेर निघायचे. त्याव्यतिरिक्त कुठेच बाहेर फिरणं नाही, वॉकला जाणं नाही. सगळं बंद होतं. त्यामुळे एका पॉइंटला रडू येऊन बसलं होतं की, हे काय होऊन बसलंय. पुढे काय होणार आहे, काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येत नव्हता. वेळ वाढतच होती. हे असे नेमके कधीपर्यंत चालणार याचा विचार करून मानसिक थकवा, वेगवेगळ्या प्रकारची भीती येत होती. आम्ही नोकरी करणारे लोक नव्हतो. त्यामुळे कामं थांबली, दोन-तीन फिल्म थांबल्या, पैसे कमी पडले तर आपण काय करायचे? उद्या कोणता कलाकार म्हणाला, माझ्याकडे पैसे नाहीत तर त्यावर कोणी विश्वास ठेवेल का? सगळ्यांची हीच परिस्थिती होती आणि मुळात याचा कालावधी निश्चित नसल्यामुळे सगळ्यांच्या मनात एक भीती तयार झाली होती. त्या भीतीला सामोरे जाणे हे एक आव्हान होते.
मुंबई पिन ड्रॉप सायलेन्स होती. रस्त्यावर चिटपाखरू दिसायचं नाही असं वातावरण होतं. हा काळ आयुष्यात आपण कधीच विसरू शकत नाही. ही अशी मुंबई बॉम्बस्फोटातही शांत नसते. सहा-सात तासांनंतर पुन्हा सगळं सुरळीत होतं. आमच्या पिढीने दंगल पाहिली, बॉम्बस्फोट पाहिले, पण तरीही मुंबई कधी थांबलेली पाहिली नव्हती. ट्रेन सुरू होऊन मुंबई सुरू व्हायची, पण आता परिस्थिती वेगळी होती, सहा महिने माणसं घरात बंद होती. बऱयाच जणांनी फिल्म पाहिल्या, पुस्तकं वाचली, पण माझं कशातच लक्ष लागत नव्हतं, इतकी भीती वाटत होती. त्यात एकटं राहत असल्यामुळे ती भीती जास्त होती. अशा वेळी स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी काही मेडिटेशनचे ऑनलाइन कोर्सेस केले. खूप जास्त आध्यात्मिक काम केलं. मेडिटेशनची चांगली पुस्तकं वाचली. दलाई लामांचं पुस्तक वाचलं. त्यामुळे अशा प्रकारची पुस्तकं वाचणं, त्यातून नोट्स काढणं, व्हिडीओज बघणं किंवा अशा पद्धतीचे स्पीचेस ऐकणं या काळात सुरू होतं. मेडिटेशन वाढलं, आधीपेक्षा जास्त योगा करायला लागले. नंतर असं लक्षात आलं की, अरे आपण खूप कमी गरजांमध्ये छान राहू शकतो. जितकी तुम्ही मनाने परिस्थिती हाताळता, जितके मनाने साधे राहता, तितके तुमच्यासाठी मार्ग खुले होतात. आतमध्ये शांती असली की, त्याचे सकारात्मरक परिणाम मनावर, शरीरावर आणि कामावर दिसायला लागतात. फार मोठी गोष्ट मी या कोरोनामध्ये शिकले. एरवी इतकं लक्ष देऊन केलं नसतं. मला याचा फार उपयोग झाला.
या काळात मी आहार चांगला ठेवला होता. गरम गरम खायचं, शिळं खायचं नाही. नियमित व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्यायचे किंवा वाफ घेणं, गरम पाणी पिणं, मीठपाण्याच्या गुळण्या करणं आणि जितपं घरात बनवून खाता येईल ते मी चालू ठेवलं. आता तर शुट सुरू झाल्यामुळे मी घरातून सगळं घेऊन जाते. घरातून निघताना उकडलेले अंडे, गरम पाण्याचा थर्मास, ग्रीन टी जास्त पिते. मास्क लावायचे. जास्त सॅनिटाईज वापरत नाही. त्याचा सातत्याने वापर चांगला नाही. त्यामुळे सरळं व्हॅनिटीत आलं की, सारखे साबणाने हात धुवायचे. उगाच कोणाशी गप्पा मारत बसायचे नाही. जितका कामाशी संपर्क येतो. शॉट झाला की, जास्तीत जास्त एकटं रूममध्ये राहायचे. तेवढे मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आहे आणि पुढच्या काळातही ठेवेन.




























































