
हिंदुस्थानी रेल्वेत आता नॉन एसी कोचचा जमाना हद्दपार होणार आहे. काही कमी वेगवान पॅसेंजर ट्रेन आणि लोकल वगळता इतर सर्व कोचेस आता वातानुकूलित होणार आहेत. नव्या ब्ल्यू प्रिंटनुसार स्लीपर कोच हटवून त्या जागी नवे एसी स्लीपर कोच आणले जाणार असून त्यामुळे रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास महागडा होणार आहे.
रेल्वेत आता आरामदायी आणि वेगवान प्रवासाचे युग अवतरणार आहे. सध्या लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये असणाऱया स्लीपर कोचचे स्वरूप बदलण्यात येणार आहे. आताच्या स्लीपर क्लास दर्जाच्या डब्यात 72 बर्थ असतात. आता हे डबे अधिकच काॅम्पॅक्ट करण्यात येऊन त्यांचे रूपांतर 83 बर्थ असणाऱया वातानुकूलित कोचमध्ये करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे या कोचचे भाडे सध्याच्या एसी कोटपेक्षा कमी मात्र स्लीपर कोचपेक्षा थोडे जादा असणार आहे. अशा प्रकारचा नवा एसी कोच रेल्वेच्या कपूरथळा फॅक्टरीत प्रायोगिक तत्त्वावर बनविण्याचे काम सुरू आहे.
टप्प्याटप्प्याने नॉन एसी डबे हटतील
एकदा का सर्व मेल-एक्स्प्रेस ताशी 130 कि.मी. किंवा त्यापेक्षा अधिकच्या वेगाने धावण्यास सुरुवात झाली की नॉन एसी कोच वारा आणि धुळीमुळे तांत्रिक अडचणच ठरतील. त्यामुळे आम्हाला क्रमाक्रमाने जवळपास 1900 मेल-एक्स्प्रेसमधील नॉन एसी कोच हटवावे लागतील असे यादव यांनी सांगितले. ही फार मोठी प्रक्रिया असेल ती टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल असेही ते म्हणाले.
नॉन एसी डबे वेगाला अडथळे
‘सुवर्ण चतुर्भुज’ प्रकल्पांतर्गत 2023 पर्यंत रेल्वेच्या 1900 मेल आणि एक्स्प्रेस गाडय़ांचा वेग दर ताशी 130 कि. मी. पर्यंत तर 2025 पर्यंत वेग दर ताशी 160 कि.मी. पर्यंत करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून हे स्लीपर कोच हटविण्यात येणार आहेत. हे खिडक्यांमधून हवा आणि धूळ आत जाऊन हे नॉन एसी डबे गाडीच्या वेगाला गतिरोधक ठरू नयेत म्हणून ते वातानुकूलित करण्याची योजना आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुविधाजनक आणि सुरक्षित होणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ विनोद पुमार यादव यांनी म्हटले आहे.
वेगवान डब्यांच्या निर्मितीसाठी पुनर्रचना
वेगवान डब्यांची निर्मिती करण्यासाठी रेल्वेच्या झोनल आणि डिव्हिजनल विभागाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. सध्याचे आठ प्रोडक्शन युनिटचे केंद्रीकरण करून दोन युनिट बनविण्याची योजना आहे. रेल्वे बोर्डाप्रमाणे प्रत्येक झोनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, डब्यांची बांधणी, ऑपरेशन आणि मेंटेनन्स आणि वित्त विभाग अशी रचना होणार आहे. तसेच डिव्हिजन ते मेंटेनन्स डेपो पातळीवर हा बदल घडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसनंतर नव्या अॅल्युमिनियम ट्रेनचा प्रोटोटाइप कोच रायबरेलीच्या मॉडर्न कोच फॅक्टरीमध्ये बांधला जात आहे.


























































