
जिंतूर तालुक्यतील चारठाणा येथून 2 कि.मी. अंतरावर असलेल्या अरसड गाव हे विकासापासून कोसो दूर आहे. येथे वाहने तर सोडाच पायी सुद्धा चालणे कठीण होऊन बसले आहे. गावाजवळील नाल्यावर पूल नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. स्वांतत्र्याच्या 75 वर्षानंतरही दोन तालुक्यात विभागलेल्या अरसड या गावातील ग्रामस्थ विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यासंदर्भात लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून रस्ता आणि पुलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकर्यांमधून जोर धरु लागली आहे.
जिंतूर-जालना या मुख्य रस्त्यापासून चारठाणा येथून 2 कि.मी. अंतरावर असलेल्या सेलू तालुक्यातील अरसड हे गाव मुख्य रस्त्यापासून दीड ते २ कि.मी. वर आहे. मात्र हा 2 कि.मी.चा रस्ता कच्चा असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होतो. परिणामी, कोणतीही वाहने या रस्त्यावरुन जाऊ शकत नाहीत. सध्या वाहने ते सोडाच या रस्त्यावरुन पायी देखील चालणे अवघड होऊन बसल्याची परिस्थीती आहे. अरसड गाव हे 30 ते 35 घरांची वस्ती आहे. तसेच चारठाणा परिसरातील अनेक शेतकर्यांची जमीन अरसड शिवारात असल्याने या रस्त्यावरुन ये-जा करावी लागते. या रस्ताच्या नाल्यावरील पुलाअभावी ग्रामस्थांना व परिसरातील शेतकर्यांना अनेक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. थोडा जरी पाऊस झाला की त्यावरुन बैलगाडी किंवा इतर वाहने सुद्धा जाऊ शकत नसल्याने शेतकर्यांना आपला शेतातील माल घरी नेता येत नाही.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी निवडणुकीत केवळ आश्वासने देतात; परंतु, निवडणुकीनंतर मात्र त्यांना विसर पडतो. त्यामुळे अरसड ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अरसड या गावाचा समावेश सेलू तालुका निर्मितीनंतर जिंतुर तालुक्यातून सेलू तालुक्यात झाला. मात्र या गावाचा समावेश जिंतूर तालुक्यातील पिंपरी (खुर्द) गु्रप ग्रामपंचायत अंर्तगत आहे. दोन तालुक्यात विभागलेल्या या गावाच्या विकास कामांकडे लोकप्रतिनिधीसह तालुका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.































































