
कर्वेनगरमधील व्यावसायिकाच्या घरात काम करणाऱ्या नोकर दाम्पत्यानेच पावणे तीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी एकाला अटक केली आहे. संजय काकेकर (वय 47) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शुभांगी आसबे ( वय 47, रा. कर्वेनगर) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी यांचे पती व्यावसायिक असून ते कुटुंबासह नवसह्याद्री सोसायटीमध्ये राहतात. त्यांनी घरकामासाठी पतीच्या गावाजवळ राहणाऱ्या एका दाम्पत्याला बंगल्यात नोकरीसाठी ठेवले होते. आसबे यांनी दाम्पत्याला त्यांच्या बंगल्याच्या पार्कींगजवळील जागेतच राहण्यासाठी व्यवस्था केली होती. त्यामुळे संबंधित दाम्पत्य फिर्यादीच्या घरामध्ये कुटुंबातील सदस्यांसारखे वावरत होते. शुभांगी गणेशोत्सवाच्या काळात गौरींना सजविण्यासाठी सोन्याचे दागिने शोधत होत्या. त्यावेळी त्यांना सोन्याच्या प्रत्येकी 15 ग्रॅम वजनाच्या चार बांगड्या सापडल्या नाहीत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा बांगड्यांचे शोध घेतला असता बांगड्या न सापडल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयावरून नोकर संजयला ताब्यात घेऊन विचारणा केली. चौकशीत त्याने बांगड्या चोरल्याची कबुली दिली. आरोपीकडून आणखी किंमती वस्तू मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.























































