
आजरा तालुक्यात सोहाळे, आजरा व सुलगाव परिसरात सलग तिसऱ्या दिवशी हत्तीचे नुकसानसत्र सुरूच आहे. काल सायंकाळी व मध्यरात्री अनुक्रमे सुलगाव-चांदेवाडी आणि सोहाळे परिसरात हत्तीने पिकांसह शेती अवजारे व पाण्याच्या टाकीचे मोठे नुकसान केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. गेले तीन-चार दिवस हत्तीचा धुमाकूळ आजरा परिसरात सुरू आहे.
आजरा शहरात धडक दिल्यावर हत्ती हिरण्यकेशी नदी पार करून सुलगाव व चांदेवाडी भागात परतला. तेथे त्याने हासबे कुटुंबातील आप्पा भैरू हासबे यांच्या पाण्याच्या टाकीचे व इतर 6 जणांसह कृष्णा कदम यांच्या शेतातील भात, ऊस व नाचणी पिकाचे नुकसान केले. त्यानंतर सोहाळे परिसरातील शेतकऱ्यांचे पीक नुकसान केल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. प्रभारी वनक्षेत्रपाल डी. बी. काटकर यांच्यासह वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत नुकसान वस्तुस्थिती जाणून घेण्यात आली.






















































