
मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळ्याचे पडसाद ‘बिग बॉस 14’ या शोमध्ये उमटले. ‘वीकेंड का वार’ मध्ये स्पर्धकांची शाळा घेताना अभिनेता सलमान खानने टीआरपी रॅकेटमधील चॅनेलवर निशाणा साधला. सच्चा खेळ खेळा. विनाकारण ओरडून काहीही होत नसते, प्रेक्षक चॅनेल बंद करतील, असा टोला सलमानने लगावला. यावेळी सलमानने कुठल्याही चॅनेलचे थेट नाव घेतले नाही तरी त्याचा रोख कुणाकडे होता हे साऱ्यांना कळून चुकले.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात काही चॅनेलने सलमानला लक्ष्य केले होते. प्राईम टाईम शोदरम्यान न्यूज चॅनेल्सवर सलमानला सवाल केले जात होते. त्यावेळी सलमानने उत्तर देणे टाळले होते. मात्र योग्य वेळ येताच टीआरपी घोटाळ्याच्या निमित्ताने त्याने प्रत्युत्तर केले आहे. ‘वीकेंड का वार’मध्ये टीआरपीसाठी आपलं नाव घेणाऱ्या लोकांना अप्रत्यक्षपणे सलमान म्हणाला, आपले सिनेमा कोण बघतो? जनता. आपल्या सगळ्यांनी टीआरपी हवाय पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही कराल. तुम्हाला प्रामाणिकपणाने, सच्चेपणाने आणखी चांगलं बनायचं आहे. खोटय़ा बातम्या पसरवून किंवा ओरडून पुढे जायचं नाही.
सलमान पुढे म्हणाला, असे समजू नका की मी वायफळ बडबड करतोय. खोटे बोलत आहे. ओरडतो आहे. मुद्दा हा नाही. लोक आपले चॅनेल पाहणे बंद करतील. मला जे म्हणायचे होते ते मी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. सलमाने बिग बॉसच्या स्पर्धकांच्या कामगिरीवर काहीशी नाराजी व्यक्त केली, पण सच्चा खेळ खेळण्याचा त्यांना सल्ला दिला.




























































