कोल्हापूर जिल्ह्यात वीजबिलांची थकबाकी 834 कोटींवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या मार्च ते सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीजबिलांच्या थकबाकीत तब्बल 332 कोटी 94 लाख रुपयांनी वाढ झाली असून, सद्यस्थितीत 7 लाख 34 हजार घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक व कृषिपंपांसह इतर ग्राहक यांच्याकडे एकुण 834 कोटी 31 लाख रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीज बिलांचा भरणा करून सहकार्य करावे,असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.

कोरोनाच्या संकटापूर्वी मार्चपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील 2 लाख 37 हजार वीजग्राहकांकडे 501 कोटी 36 लाख रुपयांची थकबाकी होती.गेल्या मार्चपासून कोरोना विषाणू चे संकट सुरु झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतर वीजबिलांचा भरणा कमी झाला.मार्च ते सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात थकबाकीदार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत दुपटीने 4 लाख 87 हजारांनी वाढ झाली असून थकबाकीची रक्कम देखील तब्बल 224 कोटी 38 लाखांनी वाढली आहे.सद्या कोल्हापूर जिल्ह्यात 5 लाख 86 हजार घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे 257 कोटी 78 लाख तसेच कृषिपंप व इतर 1 लाख 48 हजार 700 ग्राहकांकडे 576 कोटी 48 लाख रुपयांची अशा एकूण 7 लाख 34 हजार ग्राहकांकडे 834 कोटी 31 लाख रुपयांची थकबाकी आहे.

यापूर्वी ‘लॉकडाऊन’मधील वीजबिलांबाबत निर्माण झालेला संभ्रम महावितरणकडून दूर करण्यात आला आहे.वीजक्षेत्रातील तज्ञांनी सुद्धा वीजबिल अचूक असल्याचा निर्वाळा दिला आहे. महावितरणच्या सर्व कार्यालयांतर्गत बिलांबाबत प्राप्त झालेल्या हजारो तक्रारी व सर्व ग्राहकांचे शंकानिरसन करण्यात आले आहे.ग्राहकांनीही वीजबिल रिडींगप्रमाणे अचूक असल्याचे मान्य केले असले तरी वीजबिल भरण्याचे प्रमाण वाढलेले नाही.त्यामुळे थकबाकीत मोठी वाढ होत असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या चिंताजनक असल्याचे नाळे यांनी म्हंटले आहे.

वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमिवर विजेची मागणी व पुरवठ्यात महावितरणला वीज खरेदी चा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे.दरमहा वसुलीच्या सुमारे 80 ते 85 टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते.‘अनलॉक’मुळे वाणिज्यिक वापर,रब्बी हंगाम व सणासुदीचे दिवस,औद्योगिक उत्पादन आदींमुळे या महिन्यां- पासून वीजमागणीत मोठी वाढ होत जाणार आहे.दुसरीकडे थकबाकी वाढतच असल्याने वीजखरेदीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न महावितरणसमोर उभा ठाकणार आहे.कोरोना संकटासह नैसर्गिक आपत्तीत प्रतिकूल परिस्थितीत महावितरणकडून अहोरात्र ग्राहकांना सेवा दिली जात आहे.महावितरणच्या या गंभीर आर्थिक कोंडीच्या परिस्थितीत वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे,असे आवाहन अंकुश नाळे यांनी केले आहे.