आभाळमाया – खगोल सप्ताह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> [email protected]

पाऊस काढतं पाऊल घेता घेता रेंगाळतोय. साधारण ऑक्टोबरच्या आरंभी पावसाने निरोप घेतला की रात्रीचं आकाश हजारो तारकांनी पुन्हा चमचम करू लागतं. आकाशदर्शनाची आवड आणि अभ्यास या दोन्हीसाठी खगोल निरीक्षक दुर्बिणी सरसावून शहरापासून दूर, कोणतंही प्रदूषण नसलेल्या जागी रात्रीचा डेरा टाकतात. रात्रभर जागून आकाशीची दौलत मनात आणि शक्य तर कॅमेऱयात साठवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. गेली 35 वर्षे आम्हीही समूहाने हा अवकाशानंद अनुभवला; परंतु या वर्षी मार्चपासून सारं जग कोरोनाने घरबंद केल्याने आकाशदर्शनाचा एक मोसम वाया गेल्याची खंत खगोलप्रेमींच्या मनात नक्कीच दाटून आली. आता पावसाळा संपल्यानंतरचा काळ कसा येतो ते पाहायचे. सध्या तरी समूह कार्यक्रम शक्यच नाहीत.

दरवर्षी 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या काळात जागतिक पातळीवर ‘खगोल सप्ताह’ साजरा केला जातो. एक तर उत्तर गोलार्धातली ‘रात्र’ हळूहळू मोठी व्हायला लागलेली असते. पावसानंतरचं वातावरण आल्हाददायक असतं. मात्र या सप्ताहाची जागतिक सुरुवात 2000 पासून झाली. त्याला आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. 4 ऑक्टोबर 1957 रोजी रशियाचा ‘स्पुटनिक’ हा पहिलावहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात उडाला. मानवनिर्मित ‘यान’ थेट अवकाशात जाण्याचा तो अपूर्ण क्षण होता आणि 1966 मध्ये 10 ऑक्टोबरला अवकाशाचा उपयोग शांततामय कारणांसाठीच करण्यावर जगाने सहमती व्यक्त केली. त्यामुळे या आठवडय़ाचं महत्त्व लक्षात घेऊन खगोल सप्ताहाची संकल्पना प्रत्यक्षात उतरली.

या काळात खगोल अभ्यासक स्वतःच्या दुर्बिणी घेऊन आकाशदर्शन, खगोलीय छायाचित्रण करतातच. पाश्चात्य देशात त्याचं प्रमाण खूप आहे. युरोपात आणि विशेषतः अमेरिकेसारख्या देशात स्वतःच्या प्रभावी दुर्बिणी घेऊन आकाशदर्शनाच्या ‘फिल्ड’वर लोक कार घेऊन जातात. तिथल्या जवळपासच्या ‘ऍस्ट्रॉनॉमी क्लब’ने त्यांची सगळी सोय केलेली असते. फिल्डवर ठिकठिकाणी असलेल्या खांबांवर विजेचे कनेक्शन असल्याने तिथे त्यांना स्वयंचलित टेलिस्कोप लावता येतात. समूहाने आकाशदर्शन किंवा बऱयाच प्रेक्षकांना बोलावून रात्रभर आकाश समजावून सांगणे असा प्रकार तिथे असलाच तर अपवादात्मक. आमच्या खगोल मंडळाचे सभासद असलेले मृणाल आणि प्रदीप काही वर्षे अमेरिकेत असताना आकाश समजावून देऊ लागले. तेव्हा तिथल्या लोकांना आश्चर्यमिश्रित कौतुक वाटायचे.

तसा तिकडे काही वेळा ‘साइडवॉक ऍस्ट्रॉनॉमी’ नावाचा प्रकार असतो. शहरात, गावात एखाद्या निरभ्र काळोख्या रात्री दोन-तीन तास फुटपाथवर दुर्बिणी लावून लोकांना आकाशातील काही ग्रह आणि ठळक तारकासमूह (नक्षत्र) पाहण्याची संधी मिळते. आपल्याकडे मात्र गेल्या चार दशकांत शेकडो लोकांच्या आकाशदर्शनासाठी कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले. काही महत्त्वाची अवकाशस्थ घटना, म्हणजे विशिष्ट धूमकेतू, अधिक्रमण, ग्रहण, उल्कावर्षाव किंवा काही ग्रहांचं मनोहारी दर्शन घडवण्यासाठी खगोल मंडळासारख्या संस्था कार्य करू लागल्या. लेझर टॉर्च घेऊन एकेक तारका समूह आणि त्यामागचं ऍस्ट्रोफिजिक्स, कॉस्मॉलॉजी याची माहिती रंजक स्वरूपात लोकांपुढे मांडली जाऊ लागली. आता आकाशदर्शनाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होत असतात; परंतु 1986 मध्ये ‘हॅले’चा धूमकेतू येण्यापूर्वी अशी वैज्ञानिक जनजागृती नव्हती. ‘हॅले’ हा टर्निंग पॉइंट ठरला. सिंह राशीतल्या एका उल्कावर्षावाचा आनंद अनुभवण्यासाठी आमच्या कार्यक्रमाला सुमारे आठ ते दहा हजार लोक आले होते, पण पावसाने त्यावर पाणी ओतलं! ही गोष्ट नोव्हेंबरमधली. पाऊस कधी घोळ घालेल सांगता येत नाही.

गेली काही वर्षे ‘खगोल सप्ताह’ साजरा करण्यासाठी खगोल मंडळाच्या नाशिक विभागाने एक उपक्रम सुरू केला. सुजाता बाबर यांच्या संकल्पनेतून 4 ते 10 ऑक्टोबर असा रोज एक ‘खगोल विश्व’चा अंक प्रसारित करण्यात आला. यंदाही हे माहितीपूर्ण अंक खगोलप्रेमींना ऑनलाइन मिळाले. (ते हवे असतील तर [email protected] या ईमेलवर सुजाता बाबर यांच्याशी संपर्क साधावा). याच मालिकेतल्या अंकांचे मुखपृष्ठ या लेखासोबत आहे. ‘कोविड’ काळ लवकर संपावा आणि पावसानेही योग्य वेळी निरोप घ्यावा, म्हणजे अवघं अवकाश खगोलाची आवड असलेल्यांना साद घालेल. प्रतीक्षा त्याचीच आहे.