
जन्म-मृत्यूचे जुने दाखले मिळण्यासाठी आता पालिकेच्या विभाग कार्यालयात सर्वसामान्यांना हेलपाटे घालावे लागणार नाहीत. आता असे जुने दाखले ऑनलाईन मिळवता येणार आहेत. येत्या 14 दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबईतील जन्म आणि मृत्यूची नोंद पालिकेकडे करणे अनिवार्य असते. मात्र, काही जणांचा जन्म हा 45 ते 50 वर्षांपूर्वी झाला आहे. मात्र, त्यांनी अजूनही जन्माचे हे दाखले घेतले नाहीत किंवा मृत्यूची नोंद केली नाही, ज्यांनी असे दाखले घेतले पण त्यांच्याकडून ते हरवले आहेत, अशा व्यक्तींसाठी पालिका आता लवकर हे दाखले ऑनलाईन मिळवून देणार आहे. पालिका मुख्यालयात नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात जुने जन्म-मृत्यूचे दाखले ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा झाली असून येत्या काही दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
जुन्या दाखल्यांचे डिजिटलायजेशन होणार
मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. पालिका कार्यालयात 2007 पर्यंत जन्म आणि मृत्यूचे दाखले लिखित स्वरूपात मिळत होते. त्यानंतर संगणकीकरण झाले आणि नागरिकांना संगणकीय दाखले मिळू लागले. मात्र, ज्या व्यक्तींना 45 ते 50 वर्षांपूर्वीचे जन्म आणि मृत्यूचे दाखले हवे असतील तर अशा व्यक्तींना पालिका कार्यालयात दररोज हेलपाटे मारावे लागतात. त्यासाठी वेळ वाया जातो. त्यामुळे पालिका वॉर्ड कार्यालयातील जुन्या नोंदवह्या स्कॅन करून असे दाखले डिजिटलाईजेशनमध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्याची नोंद कॉम्प्युटरमध्ये करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींना जन्म-मृत्यूच्या जुन्या नोंदी हव्या असतील त्यांना त्या त्वरित उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.






























































