पाथर्डी – बिबट्याचा 3 वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्री आठच्या सुमार …वादळी वारे… जोराचा पाऊस … कीर्र अंधार …अशा भयान वातावरणात तालुक्यातील मढी येथे बिबट्याने हल्ला करून तीन वर्षाच्या बालिकेला फरफटत जंगलात नेले. आजी आजोबांनी बालिकेला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले . गुरवारी सकाळी मुलीचा मृतदेह जंगलात सापडला .या हल्ल्यात एक महिला सुद्धा गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर पाथर्डीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मढी शिवारातील डोंगराच्या पायथ्याला आडबाजूला असलेल्या वस्तीवर श्रीधर साळवे ,विजय साळवे यांची घरं आहेत. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विजय साळवे यांच्या पत्नी उषा ह्या घराबाहेर आल्या त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. महिलेच्या पतीने प्रतिकार करत पत्नीची बिबट्याच्या जबड्यातून सुटका केली .जखमीला तिच्या कुटुंबीयांना दवाखान्यात नेले त्याच दरम्यान सुमारे शंभर मीटर अंतरावर असलेल्या श्रीधर साळवे यांची नात श्रेया सुरज साळवे (वय 3 ) लघुशंकेसाठी दारा बाहेर पडताच बिबट्याने तिच्यावर झडप घातली तीचा आवाज ऐकुन आजी-आजोबा धावले. नातीचा आक्रोश त्यांना पाहवेना त्यांनी लगेच कानिफनाथ गडावर फोन करून लाऊड स्पीकर वरून मदतीची आव्हान केले .गावातील सुमारे तीन-चारशे तरुण वनकर्मचारी ग्रामस्थ भर पावसात तात्काळ धावले. रात्रभर शोधाशोध करून मुलीचा पत्ता लागला नाही. गुरवारी सकाळी घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दरीमध्ये मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला.