
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व समालोचक किशोर भिमाणी यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रिता व मुलगा गौतम असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर क्रीडाक्षेत्रामधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
किशोर भिमाणी यांना काही दिवसांपूर्वी मेंदूसंबंधित झटका आला होता. रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तसेच गेल्या महिन्यात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची बातमीही मीडियामधून प्रसिद्ध करण्यात आली आहे. हिंदुस्थानचे माजी दिग्गज फिरकी गोलंदाज यांनी किशोर भिमाणी यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, किशोर भिमाणी हे जुन्या शैलीचे क्रिकेट लेखक होते. त्यांचे क्रिकेट या खेळावरील वर्णन क्रिकेटपटूच्या खेळीप्रमाणेच होते.
1986 ऐतिहासिक टाय टेस्टचे साक्षीदार
किशोर भिमाणी यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. 1980 चा काळ त्यांनी गाजवला. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चेन्नई येथे 1986 साली झालेल्या ऐतिहासिक टाय टेस्टसाठी त्यांनी समालोचन केले होते. मीडिया इंडस्ट्री व क्रीडा समालोचक म्हणून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीला जीवनगौरव पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले आहे.





























































