परतीच्या पावसाचा तडाखा! सोलापुरात आभाळ फाटले, पंढरपुरात भीमेला महापूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या मुसळधार पावसाने पुणे शहर, जिल्हा, सोलापूर, पंढरपुरात अक्षरशः आभाळ फाटले आहे. सोलापूर जिल्हय़ात 565 गावांना पाण्याचा वेढा पडला असून, 17 हजारांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दोन दिवसांत 14 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो पुल पाण्याखाली गेल्यामुळे 180 मार्गांवरील वाहतुक बंद झाली आहे. पंढरपुरात भीमा नदीला महापूर आल्याने 55 गावांतील 6748 नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात आले. कोल्हापुरात धुवांधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत 10 फुटांनी वाढ झाली. तसेच राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. सांगलीत कृष्णेने 34 फुटांची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. पुणे जिल्हय़ात सर्व नद्या, ओढे तुटुंब भरून वाहत असुन, बारामती, भिगवण, इंदापूर येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सांगलीत कृष्णेने 34 फुटांची पातळी ओलांडली

संततधार पावसाने सांगली जिह्यात हाहाकार माजवला असून, जिह्यातील 30 पूल आणि 22 रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. सांगली, मिरज शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत.

उजनी धरणातून 2 लाख 32 हजार, तर वीर धरणातून 53 हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने भीमा नदीला महापूर आला आहे. महापुराचे पाणी पंढरपूर शहरात घुसले असून, 400 कुटंबातील 1657 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. नदीकाठच्या 55 गावांतील 6748 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

स्विफ्ट डिझायर वाहून गेली

टेंभुर्णी तालुक्यातील जिह्यातील निमगाव-दहिवली मार्गावर असणाऱया पुलावरून पाणी असतानाही स्विफ्ट डिझायर मोटारचालकाने पाण्याचा अंदाज न घेता मोटार नेल्यामुळे ती वाहून गेली. यामधील तीनपैकी दोघांना वाचविण्यात नागरिकांना यश आले. मात्र, चालक शिवाजी यादव यांचा मृत्यू झाला.

चंद्रभागा घाट दुर्घटनाप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

चंद्रभागा तीरावरील कुंभार घाटाची भिंत कोसळून सहाजणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी घाटबांधणी करणारे ठेकेदार अशोक भागवत इंगोले, हुले ए.बी.आय.सह कन्स्ट्रक्शन बीड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापुरात धुवाधार; ‘राधानगरी’चे दोन दरवाजे उघडले

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाज्यांतून दुपारपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत दहा फुटांची वाढ होऊन, 17 बंधारे पाण्याखाली गेले होते.

नृसिंहवाडीत मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा

कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत 15 फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात गुरुवारी सकाळी मोसमातील तिसरा मात्र अवेळी ऑक्टोबर महिन्यामध्ये दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.