
संभाजीनगर मधल्या वडगाव येथे सात वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील विकृताने पीडितेचे ओठ तोडून तिला गंभीर जखमी केले.
वडगाव (को.) येथील साजापूर रस्त्यावर एका तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर काही मजूर व चिमुकलीचा मामाही काम करतात. सात वर्षीय चिमुकली मामाच्या घरी आली होती. शुक्रवारी (ता.16) रात्री ती आजीसोबत पत्र्याच्या खोलीत झोपली. तर तिचा मामा व काही मजूर निर्माणाधीन इमारतीच्या वरच्या मजल्यावर झोपले होते. एका नराधम आरोपीने मजुराचा एक मोबाईल चोरून घेतला. त्यानंतर आजी सोबत झोपलेल्या मुलीला उचलून नेऊन तिच्यावर शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे ओठ तोडून तिला गंभीर जखमी केले.
या घटनेतील पीडित मुलगी कशीबशी त्याच्या तावडीतून सुटत ओरडतच घराकडे पळाली. त्यामुळे शेजारी जागे झाले. हे लक्षात येताच आरोपीने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपीची ओळख व शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही पडताळण्यात येत आहेत.




























































