
खेकडय़ांच्या नवनवीन प्रजाती, पश्चिम घाटातील वैशिष्टय़पूर्ण पाली यांच्या शोधानंतरही निसर्गाच्या जैवविविधतेतील नावीन्य शोधण्याचे तेजस ठाकरे यांचे संशोधन सुरूच आहे. तेजस ठाकरे यांनी आता आंबोली घाटातील हिरण्यकेशी नदीत सोनेरी रंगाचे केस असलेल्या माशाची चौथी प्रजाती शोधून काढली आहे. हिरश्यकेशी नदीत सापडलेल्या या माशाचे नावही ‘हिरण्यकेशी’ ठेवण्यात आले आहे.
जैवविविधतेतील संशोधनात सतत व्यस्त असणारे तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमकडून सह्याद्रीच्या पर्वतरांगांत खडतर परिश्रम करून संशोधन केले जात आहे. या संशोधनादरम्यान आंबोली घाटातील हिरण्यकेशी नदीत सोनेरी रंगाचे केस असणाऱया माशाची नवीन प्रजाती तेजस ठाकरे यांना आढळून आली आहे. या नवीन प्रजातीला शोधण्यासाठी तेजस ठाकरे यांना अंडरवॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि रिसर्च पेपरचे प्रमुख डॉ. प्रवीणराज जयसिन्हा यांचे सहकार्य लाभले.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील दागिना
आंबोली घाटातील हिरण्यकेश्वर मंदिरातील पुंडातून हिरण्यकेशी नदीचा उगम झाला आहे. हिरण्यकेशी याचाच अर्थ सोनेरी केसांचा. तेच नाव या माशाला देताना ‘शिस्तुरा हिरण्यकेशी’ असे त्याचे नामकरण करण्यात आले. ‘अॅक्वा’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला असून हा मासा म्हणजे सह्याद्रीच्या हृदयातील एक दागिनाच असल्याचे तेजस ठाकरे यांनी
आपल्या इन्ट्राग्राम पोस्टमध्ये नमूद केले आहे.
– याआधी संशोधन करताना तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या रांगांत 11 प्रकारच्या खेकडय़ांच्या नवीन प्रजातींचा शोध लावला होता. न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ या विज्ञानपर नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडिटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी त्याचप्रमाणी सह्याद्री पर्वतरांगेत सापडल्याने ‘सह्याद्रीयाना’ असेही खेकडय़ांचे नामकरण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे पश्चिम घाटात वैशिष्टय़पूर्ण पालींचाही त्यांनी काही महिन्यांपूर्वीच शोध घेतला होता.



























































