जलयुक्त शिवार भ्रष्टाचारप्रकरणी सूडबुद्धीने चौकशी नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फडणवीस सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सूडबुद्दीने किंवा मुद्दाम लावण्यात आलेली नाही. कॅगच्या अहवालावरून या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात कॅगचा अहवाल सादर करण्यात आला होता.

या अहवालात जलयुक्त शिवार योजनेबाबत नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली. जलयुक्त शिवार योजने संदर्भातील कॅगचा अहवाल कुणाच्या काळात आला, कारण नसताना या विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना फडणवीस सरकारमध्ये जलसंधारण खाते ज्यांच्याकडे होते त्यांनीच विधान परिषदेत या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले होते. तसे सूतोवाच त्यांनी केले होते, असे अजित पवार म्हणाले.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत माहिती नाही
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार मला काही जण भेटून गेले. त्यामुळे एखाद्याची भेट झाली म्हणजे काही काळेबेरे समजू नये. भाजप सरकार असताना आम्हीदेखील लोकप्रतिनीधी या नात्याने त्यांना भेटायचो. मी तर सगळ्यांना भेटत असतो. खडसेंच्या प्रवेशाबाबत मला काही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.