
नवरात्रोत्सव सुरू होताच महाराष्ट्राला वेध लागतात ते शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा होणार का? अशी अस्वस्थता मनामनात असताना दसरा मेळावा नेहमीच्याच जल्लोषात, उत्साहात होणारच असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज येथे स्पष्ट केले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संस्पृती आणि राजकीयदृष्टय़ाही महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या परंपरेचाच तो देदीप्यमान भाग बनला आहे. केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष या दसरा मेळाव्याकडे लागलेले असते. यंदा हा मेळावा ऑनलाइन होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता, परंतु ही शक्यता फेटाळून लावताना संजय राऊत यांनी हा मेळावा जोशात होणार असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून प्रदीर्घ काळानंतर महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री लाभलेला आहे याचा उल्लेख करीत संजय राऊत पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तसेच ते शिवसेनेसारख्या लढाऊ संघटनेचे प्रमुखही आहेत. ते काय बोलतात, काय मार्गदर्शन करतात याकडे सगळय़ांचेच लक्ष लागलेले असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण व्यासपीठावरूनच होईल.
नियमांचे उल्लंघन होणार नाही
सरकारने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊनच हा मेळावा होईल, असे संजय राऊत यांनी पुढे स्पष्ट केले. या मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसांत त्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी पुस्तीही संजय राऊत यांनी पुढे जोडली.


























































