अस्मानी संकटातील बळीराजाचे अश्रू पुसणार! मुख्यमंत्री आज सोलापुरातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm

एकीकडे कोरोनाशी लढाई, तर दुसरीकडे अस्मानी संकट… बळीराजा असा दुहेरी संकटात सापडला आहे. परतीच्या पावसाने तर उभ्या पिकांची नासाडी केली. घाम गाळून कष्टाने उभ्या केलेल्या शेतशिवारात महापूर, तर डोळ्यांत अश्रूंचा महापूर… अशी विदारक स्थिती असताना या बळीराजाला धीर देण्यासाठी, त्याचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सोलापूर जिह्यातील भागांची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत.

राज्यात यंदा सर्वदूर पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्ग अतिशय आनंदात होता, पण परतीच्या पावसाने शेतकऱयांची मेहनत अक्षरशः पाण्यात गेली. शेतकऱयांनी कष्टाने उभी केलेली शेकडो हेक्टरवरील पिके मातीमोल झाली. मुसळधार पाऊस व नद्यांना आलेल्या पुराचा मोठा फटका शेतीला बसला. पिके तर उद्ध्वस्त झालीच, पण मुसळधार पावसाच्या तडाख्यात घरेही कोसळली. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूरच्या दौऱयावर रवाना होत आहेत. सोलापूर विमानतळावर सकाळी 8.45 वा. मुख्यमंत्र्यांचे आगमन होईल. त्यानंतर सोलापूर जिह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्दमध्ये तसेच रामपूर, बोरी उमरगे या भागांत अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची तसेच शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी करतील. या दौऱयात मुख्यमंत्री अक्कलकोटमधील हत्ती तलावाचीही पाहणी करणार आहेत. पिकांची पाहणी तसेच ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर पूरपरिस्थितीबाबत प्रशासकीय यंत्रणेसोबत सविस्तर चर्चा करतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा

  • स. 8.45 – मुंबईहून विमानाने सोलापूर विमानतळावर आगमन
  • स. 9.20 – अक्कलकोटला प्रयाण
  • स. 10.35- सांगवी खुर्दमध्ये नैसर्गिक आपत्तीने पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा
  • स. 10.50- मोटारीने सांगवी पुलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी
  • स. 11.25 -अक्कलकोट शहरातील हत्ती तलावाची पाहणी
  • स. 11.55 – रामपूरमध्ये अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी
  • दु. 12.25 – अक्कलकोट तालुक्यातील बोरी उमरगेमध्ये आपत्तीग्रस्त घरांची व शेती नुकसानीची पाहणी
  • दु. 3 – सोलापूर शासकीय विश्रामगृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पूरपरिस्थितीबाबत चर्चा व अभ्यागतांच्या भेटी

बुधवारी धाराशीवमध्ये

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 21 ऑक्टोबरला धाराशीव जिह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱयात मुख्यमंत्री जिह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधतील.