
>> मंगेश सौंदाळकर
लॉकडाऊन काळात नागरिक घरात किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये असताना चोरटय़ांनी चोऱया, घरफोडय़ा केल्या. या चोरटय़ाना फिंगर प्रिंट ब्युरोच्या कामगिरीमुळे तुरुंगाची हवा खावी लागली. राज्यात 3 हजार 815 क्राईम विझिट करून 63 गुन्हेगारांना गजाआड करण्यात फिंगर प्रिंट ब्युरोचा वाटा आहे.
लॉकडाऊन काळात राज्यात जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस रस्त्यावर तैनात होते. तेव्हा हत्या, चोरी, घरफोडी, दरोडा, सारख्या घटना घडत होत्या. एकीकडे पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचा आलेख वाढत असतानाही फिंगर प्रिंटचे अधिकारी हे घटनास्थळी जाऊन नमुने घेत होते. ज्या घरात कोरोनाचे रुग्ण आढळत होते, त्या घरात घरफोडीच्या घटनेनंतर फिंगर प्रिंटचे अधिकारी जीव धोक्यात घालून तेथे भेटी देत असायचे. फिंगर प्रिंटच्या अधिकाऱयांनी राज्यात 3 हजार 815 ठिकाणी जाऊन भेटी दिल्याची नोंद आहे.
– राज्यात 42 पोलीस जिल्हा घटकामध्ये फिंगर प्रिंट तज्ञ हे घटनास्थळी भेटी देतात.
– 2019 मध्ये फिंगर प्रिंट मुंबई युनिटने शहरात 1,281 ठिकाणी भेटी देऊन 104 तर (सप्टेंबर) 2020 मध्ये 575 ठिकाणी भेटी देत 19 आरोपीना तुरुंगाची हवा खायला लावली.
6 लाख 85 हजार 613 गुन्हेगारांचा रेकॉर्ड संग्रहित
फिंगर प्रिंट हा न्यायालयात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. एखाद्या गुह्यात अटक झालेल्या आरोपीचे पोलीस ठाण्यात ठसे घेतले जातात. पण आता अम्बीस प्रणालीच्या माध्यमातून फिंगर प्रिंट ब्युरोने आतापर्यंत राज्यात 6 लाख 85 हजार 613 गुन्हेगारांचा रेकाॉर्ड संग्रहित केला आहे.


























































