
नवरात्रौत्सव म्हणजे आदिशक्तीचा जागर. सध्याच्या कोरोनाच्या संकटात आपल्या जिवाची पर्वा न करता अतुलनीय कामगिरी करणाऱ्य़ा नऊ महिलांचा नवरात्रौत्सवानिमित्त ’कोरोना रणरागिणी पुरस्कारा’ने गौरव करण्यात येणार आहे.
शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या अध्यक्षा कामिनी शेवाळे यांच्यावतीने ‘कोरोना रणरागिणी पुरस्कारा’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या दिवशी उद्योजिका आणि गेल्या 25 वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर पद्मा कपूर यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना संकटात गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी कपूर या आघाडीवर होत्या. पूर्व उपनगरात, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, मास्क, सॅनिटायझर यांचे मोठय़ा प्रमाणात वाटप त्यांनी केले. तसेच, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर कोरोना योद्धय़ांना अत्यावश्यक पीपीई किटचा पुरवठाही त्यांनी केला. अशा रीतीने नऊ दिवसांत आरोग्यसेविका, महिला पोलीस, परिचारिका, डॉक्टरांचा सन्मान करण्यात येणार आहे.



























































