
रमेश बिराजदार हा शेतकरी 24 तास झाडावर आणि पाण्यात होता. ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी बिराजदार यांची सुटका केली. सोमवारी रामपूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिराजदार यांची अस्थेवाईकपणे चौकशी केली. उपचार घेतले का, तुम्हाला आता काही त्रास होतोय का, अशी विचारणा केली. यावेळी बिराजदार यांना अश्रू अनावर झाले.
सांगवी खुर्द आणि सांगवी बुदुक या गावांना जोडणाऱया पुलावरून मुख्यमंत्र्यांनी पुराची पाहणी केली. गावकऱयांशी त्यांनी संवाद साधला.
72 वर्षांत असा पाऊस पाहिला नाही
बोरी उमरगे येथे बांधावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांशी संवाद साधला. शिवशंकर रामचंद्र कोणदे या 72 वर्षीय शेतकऱयाने तूर, ऊस व गुलाब फुलांच्या शेतीच्या नुकसानीची माहिती दिली. 72 वर्षांत असा पाऊस मी पाहिला नाही, असे कोणदे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना धीर दिला. पंचनामे सुरू झालेत का, स्थानिक पातळीवर काही मदत मिळाली का, अशी विचारणा केली.






















































