शिवसेनेचा सुरक्षित दसरा मेळावा, वृत्तवाहिन्या, सोशल मीडियावर प्रक्षेपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग… हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अखंड सुरू आहे. कोरोनाचे संकट असले तरी यंदाही त्याच उत्साहात शिवसेनेचा दसरा मेळावा रविवार, 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता संपन्न होणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या कोविडबाबतच्या नियमावलींचे यावेळी काटेकोरपणे पालन केले जाईल. शिवतीर्थ आणि दसरा मेळावा हे नाते अतूट आहे म्हणूनच शिवतीर्थानजिकच्या स्वातंत्र्यवीर स्मारक सभागृहाच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रेमी, शिवसैनिक आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परंपरेप्रमाणे शस्त्रपूजन होणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये या मेळाव्याचा प्रचंड उत्साह आहे. पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात याकडे शिवसैनिक तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. परंपरेप्रमाणे या मेळाव्यात शस्त्र्ापूजन होईल. यावेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत हेही शिवसैनिकांशी संवाद साधतील, अशी माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली.

प्रसार माध्यमे, सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचणार

कोरोना संकटकाळात नियमांचे पालन करून हा मेळावा पार पडणार असल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात शिवसेना नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तीच उपस्थित राहणार आहेत. मात्र येथील व्यासपीठावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे होणारे मार्गदर्शन सोशल नेटवर्किंग साइटस् तसेच प्रसारमाध्यमांच्या वाहिन्यांवरून सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात शिवसैनिकांनी आपल्या घरातूनच सहभागी व्हायचे आहे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनांक
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

स्थळ
स्वातंत्र्यवीर सावरकर सभाग़ृह, शिवाजी पार्क

वेळ
सायं. 6.30 वा.