बिहारमध्ये अपक्ष उमेदवाराची गोळ्या घालून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये विधानसभा निवडणूकीचा पहिला टप्प्याच्या मतदानासाठी अवघे तीन दिवस उरलेले असतानाच अपक्ष उमेदवार नारायण सिंग यांची हत्या करण्यात आली आहे. ते शेहोर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या मतदारसंघात 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

जनता दल राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असलेले नारायण सिंग हाथसर गावात प्रचार करत होते. त्यावेळी बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ते जबर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबारात त्यांचे दोन समर्थकही जखमी झाले आहेत.

नारायण सिंग विरोधात 24 गुन्हे

अपक्ष उमेदवार नारायण सिंग यांच्या विरोधात आतापर्यंत 24 गुन्हे दाखल आहे. दुमरी काटाश्री प्रांतातील नया गावचे ते सरपंच होते. त्या काळात त्यांच्यावर सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले होते.

शेहोर मतदारसंघातून 16 उमेदवार

नारायण सिंग यांचा मतदारसंघ असलेल्या शेहोरमधून तब्बल 16 उमेदवारांना अर्ज केला आहे. यात राजदचे चेतन आनंद व जदयूचे आमदार मोहम्मद शर्फुद्दीन यांचाही समावेश आहे.