
आतापर्यंत दगडातून देवदेवतांच्या मूर्ती घडलेल्या सर्वांनी पाहिल्या आहेत. मात्र, आता पालिकेच्या दहिसरमधील उद्यानांत असलेल्या दगडातून हत्ती, पांडा प्रकट झाल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी, सेल्फीसाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर परिसरातील तीन उद्यानांमधील तीन वेगवेगळ्या आकाराच्या दगडांवर विविध प्राण्यांची अत्यंत आकर्षक चित्रे काढण्यात येत आहेत. यात दहिसर पूर्व परिसरातील जरीमरी उद्यानात ‘पांडा’ तर दहिसर पश्चिम परिसरातील झेन उद्यानात हत्तीचे चित्र चितारण्यात आले आहे. या दोन उद्यानांव्यतिरिक्त दहिसर पूर्व परिसरातील शहीद तुकाराम ओंबळे स्मृती उद्यानातील एका दगडावर हरीण चितारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.





























































