पुणे – आईच्या मांडीवरून मुलाला बिबट्याने पळविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

घरासमोरील पडवीत आईच्या मांडीवर बसलेल्या पाच वर्षांच्या मुलाला बिबटय़ाने पळवून नेल्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी आईने बिबटय़ाशी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबटय़ाने हिसका देऊन मुलाला पळवून नेले.

पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावातील डोंगराच्या पायथ्याला राहणाऱया संजय मुरलीधर बुधवंत हे कुटुंबासह राहतात. सायंकाळी संजय यांची पत्नी मुलाला घेऊन पडवीत बसल्या होत्या. याचवेळी बिबटय़ाने झेप घेऊन आईच्या मांडीवरील मुलाला उचलले. मुलाला बिबटय़ा घेऊन जात असल्याचे पाहून आईने बिबटय़ाशी झुंज दिली. मुलाला पकडताना त्या मातेच्या हातात बिबटय़ाची शेपटी आली. मात्र, बिबटय़ाने हिसका दिल्याने तिच्या हातून शेपटी सुटली आणि बिबटय़ाने मुलाला तोंडात धरून डोंगरात धूम ठोकली.