
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन व इतर निर्बंधामुळे फटाका उद्योगाला मोठा फटका बसला आहे. लग्नसराई, यात्रा-जत्रा, राष्ट्रपुरुषांच्या जयंती, सण – उत्सव असा मार्च ते जून या चार महिन्याचे मोठे सिझन वाया गेले. त्यामुळे आगामी दीपोत्सवाच्या आशेने हा उद्योग पुन्हा भरारी घेऊ पाहत आहे.
’महाराष्ट्राची शिवकाशी’ अशी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील फटाका कारखान्यांचे उत्पादन पुन्हा सुरू झाले आहे. कोरोनाच्या सावटाखालीच यंदा दिवाळी साजरी होणार आहे. त्यामुळे उद्योजक लहान आकाराचे फटाकेच तयार करीत आहेत. यात टिकली डबी, आपटी बाँब, भुईचक्कर, पेन्सिल, फुलझाड, सुरसुरी, रॉकेट, छोटे लोंगी फटाके, चक्र, नागगोळी, कलर धूर, कलर कोटी, बंदूक, लेस, रंगीत काडीपेटी आदी फटाक्यांचा यात समावेश आहे.
फटाके हा बारमाही चालणारा व्यवसाय आहे. मात्र कोरोनामुळे मार्च ते जून हे उद्योगाचे सिझन वाया गेले. तसेच शासनाने मोठ्या विवाह सोहळ्याला परवानगी न दिल्यामुळे फटाके विक्रीवर परिणाम झाला आहे.
सहा महिन्यांपासून फटाक्यांची विक्री व उत्पादन बंद आहे. कारखानदार व व्यावसायिकांकडे माल शिल्लक आहे. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आहेत. दिवाळीपर्यंत परिस्थिती सुधारेल या आशेवर फटाक्यांचे उत्पादन सुरू केले आहे. शासनाने फटाका उद्योगाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सहकार्य करावे. कोरोना परिस्थितीमुळे यंदा फटाक्यांचे भाव स्थिर राहतील, असे फटाका उद्योजक म्हणाले.



























































