
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांदा साठवणुकीवरील निर्बंधांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करून मर्यादा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गुरूवारी ग्वाही देत लिलावात सहभागी होण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी सहभाग घेतल्याने नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव तब्बल चार दिवसांनंतर पूर्ववत सुरू झाले. उमराणे, देवळा व सटाणा येथे सोमवारी लिलाव सुरू होणार आहेत.
केंद्र सरकारने किरकोळ व्यापाऱ्यांना दोन, तर घाऊक व्यापाऱ्यांना 25 टन अशी कांदा साठवणुकीची मर्यादा घातली. मात्र, तेवढा कांदा अद्यापही आपल्याकडे शिल्लक असल्याचे कारण देत गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होण्यास असमर्थता दर्शविली होती. बुधवारी नाशिक दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत शेतकरी आणि व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समस्या मांडल्या. त्यांनी केंद्रातील मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
गुरुवारी शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अडचणी मांडल्या. त्यांनी साठवणुकीवरील निर्बंधांच्या अनुषंगाने केंद्राकडे पाठपुरावा करून मर्यादा वाढवून घेण्याचा शासन प्रयत्न करील, असे सांगितले. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही दिली. व्यापाऱ्यांना कांदा लिलाव सुरू करण्याचे आवाहनही केले.
त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारपासून व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग घेतला. त्याचबरोबर केंद्राने गुरूवारी कांदा खरेदीनंतर त्याची प्रतवारी आणि पॅकिंग करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. तीन दिवसांनंतर शिल्लक राहिलेला कांदा साठवणूक मर्यादेत धरला जाणार आहे, असे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले.
दरात घसरण
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये 200 ते 3000 क्विंटल यादरम्यान कांद्याची आवक होती. कळवण, विंचूरला दर स्थिर होते. इतर ठिकाणी कमाल दरात 800 ते 1000, तर सरासरीत 200 ते 1000 रूपयांनी घसरण झाली. बाजार समित्यांमधील किमान, कमाल, सरासरी दर व कंसात आवक क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे – दिंडोरी- 4400-6100-5050 (250); लासलगाव- 1100-5912-5300 (2500); पिंपळगाव- 3000-7140-5800 (3000); कळवण- 1500-6500-5800 (2400); सायखेडा- 3400-5485-5150 (850); सिन्नर- 5000-6000-5300 (200); विंचूर- 1580-6551-5300 (1500).

























































