
ग्रामीण भागातील बेघरांना घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, पंडीत दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी ’महा आवास ’ त्रैमासिक सुरु करण्यात आले आहे. या त्रैमासिकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
‘महाआवास’ त्रैमासिकाचे प्रकाशन गुरुवारी पार पडले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव संजय कुमार, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यावेळी ऑनलाईन सहभागी झाले होते.
या त्रैमासिकाच्या जुलै ते सप्टेंबर 2020 च्या अंकात गृहनिर्माण’ कार्यालयाची भूमिका, राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण योजना, त्यांची सद्यस्थिती, या योजना गतिमान करण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, राबवावयाचे नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी विषयांबाबत माहिती देण्यात आली आहे. ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम व यशोगाथांना या त्रैमासिकाच्या स्वरुपात प्रसिद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.






























































