
कणकवली मुख्य बाजारपेठ येथील सदानंद बाणे यांच्या किराणा दुकानाला रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते.
आग नियंत्रणात आणण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाला बोलावण्यात आले. मात्र, बंबात पाणी नसल्याने बंब येण्यास उशीर झाला. त्यामुळे दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टँकर बोलावण्यात आला. त्यातील पाण्याचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अग्निशामक बंब व दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टँकर आला. त्यानंतर अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
घटनास्थळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसिलदार रमेश पवार, शिवसेना नेते संदेश पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, पोलीस उपनिरीक्षक बनकर आदी उपस्थित होते. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी आगीत मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






























































