रांजणगाव परिसरातून मोबाईल चोरणारी चार जणांची टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याअंतर्गत मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या फरारी आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे स्थानिक गुन्हे शाखेने 4 आरोपीना जेरबंद केले असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने गुन्ह्यातील चोरीचे 4 मोबाईल असा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

सदर गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आदर्श गहिनीनाथ हुलगे (वय 20 वर्षे, रा. जि. सोलापूर), उत्कर्ष भीमराव बनसोडे (वय 19 वर्षे, रा. धाराशिव), महादेव शंकर जमादार (वय 22 वर्षे, रा. धाराशिव), श्रीनिवास जनार्दन माने पाटील, (रा. धाराशिव) या 4 जणांना मोबाईल चोरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार 1 नोव्हेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पाहिजे असलेल्या फरारी आरोपींचा शोध घेत होते. त्या दरम्यान रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारकडून मिळालेल्या माहितीनुसार रांजणगाव परिसरात एकूण वेगवेगळ्या कंपनीचे 18 हजार रुपये किमतीचे 3 मोबाईल चोरीस गेले होते. यातील 1 मोबाईल आदर्श गहिनीनाथ हुलगे हा वापरत असल्याचे समजताच पोलीस पथक सोलापूर येथे जाऊन आदर्श यास ताब्यात घेतले.

तेव्हा त्याच्याकडे सदर मोबाईल बाबत चौकशी करून त्याला पोलीस खाक्या दाखवताच सदरचा मोबाईल हा त्याने त्याचे इतर मित्रांच्या सोबत रांजणगाव येथून चोरून आणल्याचे सांगत गुन्ह्याची कबुली दिली. इतर 3 मोबाईल हे मित्रांकडे असल्याचे सांगितले. यावरून पोलीस पथकाने भीमराव बनसोडे, महादेव शंकर जमादार, श्रीनिवास जनार्दन माने पाटील यांना ताब्यात घेतले.

गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाईल तसेच वरील चार जणांनी चोरून नेल्याचे सांगितल्यावरून वरील आरोपींची वैद्यकीय तपासणी करून गुन्ह्यातील मुद्देमाल सहित त्यांना पुढील तपासाकामी रांजणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास रांजणगाव औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत करीत आहेत.