पोलिसांना पाहून तंतरली; पावणे दोन तासांच्या नाट्यानंतर पोलिसांनी उचलून नेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलिबाग पोलिसांनी सकाळीच रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या वरळी येथील राहत्या घरातून अटक केली. पण अर्णब यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना जवळपास पावणे दोन तास अक्षरशः झुंजावे लागले. अर्णब यांनी अटकेच्या भीतीने फुल टू ड्रामा करत पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न केला. अखेर पावणे दोन तासाच्या नाटय़ानंतर पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन गेले.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यासाठी अलिबाग पोलीस सकाळी साडेसहा वाजता अर्णब याच्या वरळी येथील अटलांटा इमारतीत गेले. पण अर्णब यांनी एक तास घराचा दरवाजाच उघडला नाही. पोलिसांनी दरवाजा उघडण्यासाठी बराच वेळ विनंती केली. मात्र पोलिसांच्या विनंतीला दाद देण्यात आली नाही. मग तासाभरानंतर साडेसातच्या सुमारास अर्णब यांनी घराचा दरवाजा उघडला. पण बाहेर पोलिसांना बघून अर्णब गोस्वामी यांची तंतरली. ते आत हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसले. पोलिसांनी त्यांना पकडून नेण्याचा प्रयत्न सुरू करताच पोलिसांनी मारहाण केल्याचा कांगावा करण्यास त्यांनी सुरुवात केली. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी सचिन वाझे व त्यांचे पथक अलिबाग पोलिसांच्या मदतीला तेथे आले. वाझे तसेच अन्य अधिकाऱयांनी अर्णब याला सोबत येण्यास अनेकदा विनंती केली. पण आडमुठेपणा करत अर्णब पोलिसांना दादच देत नव्हते. त्यातच अर्णब याच्या पत्नी आणि मुलाने पोलिसांना विरोध करण्यास सुरुवात केली. शेवटी सव्वा आठच्या सुमारास पोलिसांनी विनंती करायची सोडून आपल्या पद्धतीने अर्णब याला पकडून नेले.

पोपट पिंजऱयात बंद झाल्यानंतर भाजपला एवढा त्रास का होतोय? शिवसेनेचा सवाल
अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भाजपाचा एवढा आटापिटा का होत आह? हा भाजपचा पोपट पिंजर्यात बंद झाल्यानंतर भाजपला एवढा काय त्रास होतोय, असा सवाल परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपने महाराष्ट्रात आणीबाणीची स्थिती असल्याची टीका सुरू केली या टिकेला उत्तर देताना अनिल परब म्हणाले, अर्णब यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक झाली. चौकशीतून योग्य ते तथ्य समोर येणार आहे. दोन वर्षांपासून अन्वय नाईक यांचे कुटुंबीय न्याय मागण्यासाठी दरवाजे ठोठावत होते. त्यांना अजून न्याय मिळाला नाही, पण आता सरकारने त्यांना न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे.

वृत्तपत्र स्वांतत्र्य, आणीबाणीशी संबंध नाही
हे प्रकरण मुळीच वृत्तपत्र स्वातंत्र्य किंवा आणीबाणीशी संबंधित नाही. या प्रकरणी फिरोज शेख, नितेश सारणा यांना देखील अटक झाली आहे, पण यांच्याविषयी अजून पुणीही एक शब्द बोललेलं नाही. पण फक्त भाजपने अर्णब गोस्वामी यांच्यासाठी एवढा आटापिटा का चालवला आहे, असा सवाल अनिल परब यांनी केला आहे.

म्हणून तेजपालवर बलात्काराचा आरोप लावला?
तरूण तेजपाल यांनी भाजपाचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं, म्हणून तरुण तेजपाल यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला का? असं आता आम्ही म्हणायचं का? असा देखील सवाल अनिल परब यांनी केला.