
केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज 4 वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्ला चढवला. मोदी सरकारकडून चूक झाली नाही, तर जाणूनबुजून करण्यात आली, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
चार वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या काही उद्योगपती मित्रांना मदत करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला आणि यामुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेसोबत हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेची तुलना करत राहुल गांधी म्हणाले की, बांग्लादेशची अर्थव्यवस्था हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेच्या पुढे गेली आहे. मोदी सरकार कोरोनाचा हवाला देत असे झाल्याचे म्हणते, मात्र कोरोना तर बांग्लादेश आणि जगातील अन्य देशात देखील आहे. परंतु सरकार म्हणते त्याप्रमाणे याला कारण कोरोना नाही, तर नोटबंदी आणि जीएसटी सारखा निर्णय आहे, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
चार वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला केला. त्यांनी शेतकरी, मजुरवर्ग आणि छोट्या दुकानदारांना उध्वस्त केले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
मोदींनी ही काळ्या पैशाविरुद्ध लढाई असल्याची टिमकी वाजवली, मात्र हे खोटे होते. तो सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला होता. मोदी नागरिकांच्या खिशातील पैसा आपल्या 2-3 उद्योगपतींना देऊ इच्छित होते. सर्वसामान्य नागरिक रांगेत उभा दिसला, त्या रांगेत उद्योगपती दिसले नाहीत. नागरिकांनी बँकेत ठेवलेला पैसा उद्योगपतींच्या खिशात ओतला आणि त्यांना 3 लाख 50 हजार कोटींची कर्जमाफीची दिली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
यावेळी राहुल गांधी यांनी जीएसटीच्या निर्णयामुळे छोटे आणि मध्यम व्यापारी उध्वस्त झाले असेही म्हटले. तसेच कृषी कायदा शेतकऱ्यांना उध्वस्त करेल व यामुळे अर्थव्यवस्था आणखी रसातळाला जाईल, असेही ते म्हणाले.
नोटबंदी PM की सोची समझी चाल थी ताकि आम जनता के पैसे से ‘मोदी-मित्र’ पूँजीपतियों का लाखों करोड़ रुपय क़र्ज़ माफ़ किया जा सके।
ग़लतफ़हमी में मत रहिए- ग़लती हुई नहीं, जानबूझकर की गयी थी।
इस राष्ट्रीय त्रासदी के चार साल पर आप भी अपनी आवाज़ बुलंद कीजिए। #SpeakUpAgainstDeMoDisaster pic.twitter.com/WIcAqXWBqA
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 8, 2020
8 नोव्हेंबर, 2016
दरम्यान, आजपासून बरोबर चार वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर, 2016 ला रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याची घोषणा केली होती. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. बँक, एटीएम बाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या आणि यात अनेकांचा बळीही गेला होता.
























































