अर्थाचा अनर्थ टळेल काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देविदास तुळजापूरकर

सरकारने विविध विवाद्य प्रश्नांवर आपली दुराग्रही भूमिका सोडून सामोपचाराचे धोरण स्वीकारले नाही तर समग्र देश, समाज पुन्हा एकदा ज्वालामुखीच्या तोंडावर उभा राहील. लोकसभेतील निर्विवाद बहुमत या उद्रेकाला थांबवू शकणार नाही, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे. निवडणुकीतील जय-पराजयाच्या पलीकडे जाऊन सरकारला स्वतःच्या आर्थिक धोरणात दुरुस्ती करावी लागेल. तरच संभाव्य अनर्थ टळेल. कारण आधीच अडचणीत असलेली आपली अर्थव्यवस्था कोरोनामुळे जास्त खिळखिळी झाली आहे.

हिंदुस्थानी अर्थव्यवस्था आज एका अत्यंत धोकादायक वळणावर उभी आहे. नोटबंदी, जीएसटी या धक्क्याने अर्थव्यवस्था आधीच खिळखिळी झाली होती. त्यात भरीसभर कोरोना महामारीनंतर तर ती अधिकच अडचणीत आली आहे. यावर उपाययोजना काय केली जाऊ शकते? याची चर्चा तेव्हाच होऊ शकते जेव्हा ती अडचणीत आली आहे हे मान्य केले जाईल, पण केंद्र सरकारच्या तोंडी ही भाषा कधीच येत नाही. हे ‘जागतिक’ आहे असे म्हणत आपल्यापेक्षा वाईट स्थितीतील देशांशी तुलना करून त्यापेक्षा आपली परिस्थिती बरी आहे, असा युक्तिवाद करून त्यावर पांघरुण घातले जाते.

आजचे युग हे वित्त आणि भांडवलाचे युग आहे तसे आजची अर्थव्यवस्था ही बाजारकेंद्री आहे. या दोन निकषांवर आपण कुठे उभे आहोत यावरून आपल्या अर्थव्यवस्थेचे निदान केले जाऊ शकते. वित्त आणि भांडवल या आघाडीवर महामारीपूर्वीच आपण अडचणीत आलेलो होतो ते प्रामुख्याने थकीत कर्जामुळे. या थकीत कर्जात मोठा वाटा होता मोठय़ा उद्योगांचा. त्यांच्याकडील थकीत वसूल करण्याचे मार्ग ‘वसुली प्राधिकरण’ दिवाळखोरी कायद्याअंतर्गत प्रकरणे हाताळणारी यंत्रणा ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल’. हे दोन्ही अपेक्षित परिणाम देत नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. ज्या दिवाळखोरी कायद्याकडे नामी उपाय म्हणून बघितले जात होते त्यात हेअर कटच्या नावाखाली प्रचंड सूट दिली तरच वसुली होऊ शकते हे आता लक्षात आले आहे. या प्रयत्नांना यश येत नाही हे लक्षात घेता शेवटचा मार्ग म्हणून बँकाही थकीत कर्ज असहायतेतून राइट ऑफ करत आहेत. म्हणजे जणू माफ करत आहेत. कारण माहितीच्या अधिकारात समोर आलेली माहिती हेच सांगते की, या राईट ऑफ खात्यातून सरासरी फक्त दहा टक्के रक्कम वसूल होऊ शकलेली आहे. या थकीत कर्जामुळे, राइट ऑफमुळे बँका तोटय़ात गेल्या आहेत. भांडवल वाहून गेले आहे. म्हणूनच सरकारला वारंवार अर्थसंकल्पात तरतूद करून बँकांना भांडवल उपलब्ध करून द्यावे लागत आहे.

या थकीत कर्जाला काही प्रमाणात घोटाळेबाज उद्योग जबाबदार आहेत. तसे कायद्याच्या कचाटय़ात सापडलेले उद्योग, प्रकल्प, चुकीच्या आर्थिक, व्यापारी धोरणांमुळे अडचणीत आलेले उद्योग यांचादेखील त्यात समावेश आहे. याची किंमत शेवटी या बँकांना म्हणजेच पर्यायाने सरकारला म्हणजे अंतिमतः जनतेला मोजावी लागत आहे. कारण बँकांना भांडवलासाठी तरतूद करून द्यावा लागलेला निधी आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती, रस्तेबांधणी, धरणे, इत्यादींसाठी वापरता आला असता. कोरोना महामारीनंतर ही परिस्थिती आणखीच गंभीर होत आहे, कारण महामारीच्या काळातील लॉक डाऊनमुळे उद्योग, व्यापार, कारखाने सगळे काही ठप्प झाले होते. त्यामुळे एकूणच थकीत कर्जात मोठय़ा प्रमाणात भर पडत आहे. म्हणूनच की काय सरकारने रिझर्व्ह बँक या दोघांनी मिळून मोरेटोंरियमचा कालावधी वाढवत आता एका वर्षावर नेला आहे. तसेच दिवाळखोरी कायद्यांतर्गत प्रक्रियादेखील थांबवली आहे. पण ही झाली तात्पुरती योजना. एकदा हा मोरेटोंरियमचा कालावधी संपला की पुन्हा एकदा बँकिंग उद्योगात थकीत कर्जाचा विस्पह्ट संभवतो आणि यामुळे वित्तीय क्षेत्रातील पेचप्रसंग आज आहे त्यापेक्षा अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

अर्थव्यवस्थेच्या दुरवस्थेचे प्रतिबिंब साहजिकच वित्तीय क्षेत्रावर उमटणार आहे. यावर उपाययोजना एकच आहे, ती म्हणजे अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन. म्हणजेच ज्या बाजारावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्या बाजाराचे पुनरुज्जीवन. महामारीचा कालावधी जसा संपेल आणि एकूण परिस्थिती जेव्हा सामान्य होईल तेव्हाच या अर्थचक्राला गती येईल. तोपर्यंत सामान्य माणसाच्या हातातील क्रयशक्ती घटलेली राहणार आहे. त्यामुळे बाजारात मालाला उठाव येण्याची शक्यता नाही. यामुळे ज्या उत्पादन, सेवांची मागणी घटत राहील तो उद्योग आणि सेवा अडचणीत येणार आहेत. त्यावर अवलंबित रोजगार पुन्हा हिरावले जाणार आहेत. या बाजाराचे पुनरुज्जीवन होणार तरी कधी?

सरकारला या महामारीचा, आपत्तीचा ज्या जनसमूहावर विपरित परिणाम झाला आहे त्यांना आर्थिक मदत देऊन बाजार काही प्रमाणात जगवता आला असता, पण यासाठी लागणारा निधी येणार कुठून? एरव्ही उद्योग, व्यापार, सेवा, कारखाने बंद झाल्यामुळे कर संकलन ठप्प झाले आहे. याचा अर्थ निधीचा स्त्र्ााsत आटला आहे तर दुसरीकडे महामारी या वैद्यकीय आणीबाणीला तोंड देताना अपरिहार्यपणे सरकारला मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. यावर उपाय एकच आहे, अर्थसंकल्पातील तूट वाढवून खर्च करणे, पण त्यामुळे हिंदस्थानची आंतरराष्ट्रीय बाजारातील पत घटेल. सरकार तसेच मोठा उद्योग जो आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्ज उभा करतो त्यावरील व्याजदर वाढतील म्हणजे त्यांना कर्जासाठी अधिक किंमत मोजावी लागेल. यामुळेच की काय, सरकार हा मार्ग पत्करायला तयार नाही. मोठे उद्योग ज्यानी आंतरराष्ट्रीय बाजारात पैसे उभे केले आहेत त्याचा सरकारवर नक्कीच दबाव असणार. सरकारने तो मार्ग पत्करू नये यासाठी त्यांचं सरकारवर दबाव असणार.

सरकारने महामारीमुळे प्रभावित जनसमूहांसाठी नाममात्र मदतयोजना अंमलात आणली आहे. महिला जनधन खातेदारांना सहा महिन्यांसाठी दरमहा रुपये पाचशे अनुदान त्यानुसार देण्यात येत आहे. याशिवाय सरकारने सगळा भार बँपिंग उद्योगावर टाकला आहे. मग फेरीवाल्यांसाठी कर्ज योजना, छोटय़ा आणि मध्यम उद्योगांना 20 टक्क्यांपर्यंत विशेष कर्ज योजना इत्यादी. म्हणजे हे सगळे ओझे बँकांना पेलावे लागणार आहे. यामुळे येणाऱया काळात या बँका नक्की अडचणीत येऊ शकतात. सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा हा परिणाम आहे, जो महामारीमुळे अधिक वाढला आहे.

वित्तीय क्षेत्र आणि बाजार यांचे अर्थव्यवस्थेशी परस्परावलंबी नाते आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा या दोन घटकांवर जसा परिणाम होत आहे तसा या दोन घटकांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. या परिस्थितीत देश आणि अर्थव्यवस्था आज अजूनही कोलमडली नाही, ती आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती सतत घसरत्या राहिल्या तसेच आपल्या देशातील धान्याची गोदामे ओसंडून वाहत आहेत म्हणून. या आर्थिक अरिष्टामुळे बेरोजगारी मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. सामान्य जनांचा आर्थिक स्तर सतत घसरत आहे तर मूठभर मोठय़ा उद्योगांकडील संपत्ती अधिक एकवटत आहे. त्यामुळे आर्थिक विषमता वाढत आहे. याचा परिणाम समाजजीवनातील असंतुलनात पाहावयास मिळेल. यात पुन्हा भर पडली आहे ती नुकतेच महामारीच्या काळात शेतीविषयक, कामगारविषयक संमत केलेल्या कायद्यांची. यामुळे या दोनही समुहांत उद्रेकाला सुरुवात झाली आहे. जगण्यातला संघर्ष जसजसा वाढेल तसतसे या उद्रेकाची भयावहता वाढण्याची शक्यता आहे. लोकशाहीत या उद्रेकाला विरोधी पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटना, राजकीय, सामाजिक पक्ष, संघटना हा चेहरा असतो पण निर्विवाद बहुमताने अधिकारारूढ झालेल्या सरकारजवळ एक उद्दामपणा, एक बेफिकिरी आहे. यामुळे हे सर्व समूह आज असहाय, हतबल, उद्विग्न झाले आहेत. ते या जनसमूहात विश्वास निर्माण करण्यात असमर्थ ठरत आहेत. हे लक्षात घेता चेहरा नसलेला हा उद्रेक अधिक भयावह ठरण्याची शक्यता आहे.