बिहारमध्ये दंगली घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न होता! प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभा निवडणुकीत फायदा करून घेण्यासाठी दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव होता. पण भाजपाचा हा डाव आम्ही पूर्ण होऊ दिला नाही, असा आरोप करतानाच बिहार विधानसभेत एनडीएला काठावर बहुमत मिळालं असून आपण हा त्यांचा विजय मानत नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘बिहारमध्ये पप्पू यादव यांच्यासाठी आपण सभा घेतल्या. सभेला 10 हजारापर्यंत लोक उपस्थित असायचे.

करोना संकटात पप्पू यादव यांनी खूप मदत केल्याचं स्थानिकांनी सांगितलं. मग अशावेळी ती व्यक्ती चौथ्या क्रमांकावर कशी काय फेकली जाऊ शकते?, असा सवाल करतानाच ईव्हीएमबाबत आता अन्य राज्यांतही नाराजी व्यक्त केली जात असल्याचे आंबेडकर म्हणाले.

मोदींना रोखणे अवघड नाही

मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये रोष आहे. देशपातळीवर मोदी लाट रोखण्यासाठी मजबूत आघाडी झाली पाहिजेत. त्यात काँग्रेसला नेतृत्वहीन पद्धतीने सहभागी करून घेता येईल. लोक काँग्रेसच्या मागे जात नाहीत हे बिहर निवडणुकीने दाखवून दिले. काँग्रेसला बाजूला ठेवून जर देशपातळीवर आघाडी झाली तर मोदींना रोखणे अवघड नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.