
शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 5 हजारांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सुलतान रिझवान शेख रा. गांधीनगर येरवडा असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस गस्त घालत असताना सराईत वाहनचोर भवानी पेठेत थांबला असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमेय रसाळ आणि राहुल मोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुलतानला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खडक, लष्कर, कोंढवा, कोरेगाव पार्क परिसरातून 5 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. खडक पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतुन आरोपीला अटक केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक पोलिस निरीक्षक सुशील बोबडे, अजीज बेग, गणेश सातपुते, अनिकेत बाबर, अमेय रसाळ, सागर केकाण, संदीप कांबळे, समीर माळवदकर, राहुल मोरे, रोहन खैरे, योगेश जाधव यांच्या पथकाने केली.



























































